जि.प.च्या १४ गटातील आचारसंहिता संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:43+5:302021-07-11T04:27:43+5:30
वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट व सहा पंचायत समित्यांच्या २७ निर्वाचक गणांचा पोटनिवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २२ जून ...
वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट व सहा पंचायत समित्यांच्या २७ निर्वाचक गणांचा पोटनिवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २२ जून २०२१ रोजी जाहीर केला होता. त्यानुसार १९ जुलै रोजी मतदान व २० जुलै रोजी मतमोजणी होणार होती. या निवडणूक कार्यक्रमानुसार २९ जून ते ५ जुलै २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली. तसेच ६ जुलै रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करून वैध उमेदवारांची यादी त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशनपत्रे स्वीकारणे अथवा ती नामंजूर करण्याबाबत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे ९ जुलै २०२१ पर्यंत अंतिम मुदत होती. दरम्यान, २९ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवडणुकी संदर्भातील विविध कार्यक्रमांना राज्य निवडणूक आयोगाने ९ जुलैपासून स्थगिती दिल्याने पोटनिवडणुकीच्या पुढील कार्यक्रमास स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आचारसंहिता संपुष्टात आल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.