पोलीस -जनता समन्वयासाठी ‘कॉफी विथ पोलीस’ उपक्रम
By admin | Published: July 7, 2017 01:21 AM2017-07-07T01:21:12+5:302017-07-07T01:21:12+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षकांची संकल्पना : सोमवारी पहिला कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी जिल्ह्याचा प्रभार स्वीकारल्यानंतर अनेक सामाजिक उपक्रम तसेच प्रेरणादायी कार्यक्रम राबविले आहेत. त्यांच्या कल्पकतेतून जिल्ह्यात नवीन कार्यक्रमाचे पोलीस विभागाकडून आयोजन होत आहे. याच मालिकेत पोलीस जनता समन्वय साधण्यासाठी सामाजिक उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ‘कॉफी विथ पोलीस’ या नवीन संकल्पनेचे प्रयोजन केले आहे. या श्रृंखलेमध्ये समाजातील विविध घटकांसाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, महिला, युवती व पत्रकार बंधु, तसेच विविध व्यावसायिक जसे डॉक्टर्स, वकील, खासगी व्यवसाय करणारे व्यापारी व समाजातील इतर घटकांसाठी क्रमाक्रमाने अशा कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक सौदार्हता निर्माण करण्यासाठी आयोजित केले जाणार आहे. यामध्ये सर्वप्रथम अभ्यासू व होतकरु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुयोग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून तसेच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या व त्यावरील उपाय याबाबत सखोल चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजात जुने पोलीस मुख्यालयात करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग दर्शवावा व या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालविणाऱ्या जिल्ह्यातील संस्था, अभ्यासिकांचे संचालक, व्यवस्थापक यांनीही संस्थेतील विद्यार्थी जास्तीत जास्त या कार्यक्रमास पाठविण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.