‘कॉफी विथ पोलीस’ उपक्रमातून विद्यार्थी झाले ‘बोलके’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 02:51 PM2018-07-18T14:51:36+5:302018-07-18T14:52:57+5:30
विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, सुरक्षितता, स्पर्धा परीक्षा यासह अन्य विषयांवर पोलिसांशी मनमोकळा संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - एरव्ही पोलीस प्रशासन म्हटले की विद्यार्थ्यांच्या मनात विविध शंका, प्रश्न निर्माण होण्याबरोबरच थोडीशी भीतीही असतेच. पोलिसांप्रतीची भीती घालवून ‘पोलीस-विद्यार्थी’ नाते अधिक वृद्धींगत करण्यासाठी, संवादाची दरी कमी करण्यासाठी पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयाने १८ जुलै ‘कॉफी विथ पोलीस’ हा उपक्रम राबविला. यावेळी विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, सुरक्षितता, स्पर्धा परीक्षा यासह अन्य विषयांवर पोलिसांशी मनमोकळा संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बाबाराव राठोड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक अशोक जायभाये, सेवानिवृत्त प्राचार्य सोपान कांबळे, रवी जवंजाळ आदींची उपस्थिती होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जायभाये यांनी सुरूवातीलाच पोलिसांविषयीची असलेली भीती दूर करून या संवाद प्रक्रियेत खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले. विविध प्रश्नांवर विद्यार्थ्यांना ‘बोलते’ केल्याने विद्यार्थ्यांनीदेखील तेवढ्याच हिरीरीने उत्तरे दिले तसेच शंका, प्रश्न उपस्थित करून शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांची सुरक्षा, निर्भया पथक, सोशल मीडिया, आत्मविश्वास, भिती दूर करणे, स्पर्धा परीक्षा आदी विषयांवर हा संवाद चालला. विशेषत: सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, निर्भया पथक, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक हरीष चौधरी यांनी, प्रास्ताविक शिक्षक महेश उगले यांनी तर आभार शिक्षक मोहन चौधरी यांनी मानले.