गारंय... लुटंय... 5 रुपयांची पाणी बाटली २०मध्ये, अन्न औषध विभागाचे दुर्लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 11:59 AM2022-05-06T11:59:36+5:302022-05-06T12:02:39+5:30
दरवर्षी विशेषत: उन्हाळ्यात थंड पाण्याच्या बाटल्यांचा धंदा चांगलाच जोर धरतो. एकट्या वाशिम शहरात या माध्यमातून दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होते
वाशिम : उन्हाळा दिवसागणिक तापत चालल्याने दिवसभर पाण्यावाचून प्रत्येकाचा जीव कासावीस होत आहे. अशा स्थितीत गार पाणी प्यायला मिळाल्यास मोठा दिलासा मिळतो. त्यामुळेच बाटलीबंद पाणी विकत घेऊन अनेक जण तहान भागवत आहेत; मात्र हे पाणी थंड असले तरी ते शुद्ध असेलच याची हमी देता येत नाही. याशिवाय पाच रुपयांची बाटली चक्क २० रुपयांना विकली जात असून या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
दरवर्षी विशेषत: उन्हाळ्यात थंड पाण्याच्या बाटल्यांचा धंदा चांगलाच जोर धरतो. एकट्या वाशिम शहरात या माध्यमातून दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होते; मात्र केवळ लिटरभर पाण्यासाठी २० रुपये खर्चावे लागत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. नामांकित तथा ब्रॅन्डेड कंपन्यांनी ठरविलेल्या दरानेच ‘लोकल’मध्ये सुरू झालेल्या स्वयंघोषित कंपन्याही त्याच दराने बाटलीबंद पाणी विकत असल्याचे दिसून येत आहे. हे पाणी खरोखरच सर्व निकष पाळून शुद्ध केले जातेय का, हे पाहण्याची तसदी मात्र कुणीही घेत नाही.
पाणी नमुने तपासले जातात का?
पाण्यात साधारणत: आर्सेनिक, कॅडमियम, झिंक आणि मर्क्युरी (पारा) अशा जड धातूंचे घटक समाविष्ट असतात. ज्यामुळे मेटॅबाॅलिझम प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होणे, मज्जासंस्था व किडनीचे कार्य बिघडणे आदी प्रकारचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेळोवेळी पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जाणे आवश्यक आहे; मात्र या महत्त्वपूर्ण बाबीकडे कुणीही लक्ष देत नाही.
शहरात तिघांनाच परवानगी
वाशिम शहरात बाटलीबंद पाणी तयार करून विक्री करण्याची परवानगी केवळ तीन व्यावसायिकांनाच देण्यात आलेली आहे. ‘बीआयएस’ (ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड)ची मान्यता असल्याशिवाय बाटलीबंद पाणी तयार करून ते विक्री करण्याचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून दिला जात नाही. असे असले तरी बाटलीबंद पाणी विक्री करण्याच्या व्यवसायात छुप्या मार्गाने अनेक जण उतरले असून त्यांच्यावर सध्यातरी कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
मनुष्यबळच नाही
विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात चालतो. हे पाणी शुद्ध की अशुद्ध हे तपासण्यात यायला हवे; मात्र अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळच नाही. त्यामुळे तपासणी मोहीम थंडबस्त्यात आहे.