सहकारी जिनिंग-प्रेसिंगला उतरती कळा

By admin | Published: January 19, 2015 02:34 AM2015-01-19T02:34:01+5:302015-01-19T02:34:01+5:30

खासगी जिनिंग भरभराटीस; शासनाचे कापूस धोरण कारणीभूत.

Collapse of cooperative ging-press | सहकारी जिनिंग-प्रेसिंगला उतरती कळा

सहकारी जिनिंग-प्रेसिंगला उतरती कळा

Next

नाना देवळे/ जगदीश राठोड / मंगरुळपीर/ मानोरा:
जिल्हय़ातील मंगरुळपीर आणि मानोरा या ठिकाणच्या सहकारी जिनिंग-प्रेसिंगला उतरती कळा लागली असून, जवळपास तीन दशकांपूर्वी भरभराटीस असलेले हे जिनिंग व्यवसाय आज शेवटच्या घटका मोजत आहेत. या उलट खासगी जिनिंग भरभराटीस येत असल्याचे चित्र दिसत असून, खासगी व्यक्ती करू शकते ते सहकारात का होत नाही, असा प्रश्न त्यामुळे निर्माण होत आहे. सहकार क्षेत्रातील जिनिंगला उतरती कळा येण्यास शासनाचे धोरण आणि शेतकर्‍यांची बदलती मानसिकता कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगरुळपीर येथे शहराच्या बाहेरच्या भागात अकोला मार्गावर ६ सप्टेंबर १९७६ मध्ये १0 एकर जागेवर सहकारी जिनिंग आणि प्रेसिंगची स्थापना झाली, तसेच याच संस्थेकडून तालुक्यातील शेलूबाजार येथे ४ एकर जागेवर जिनिंगची स्थापना करण्यात आली. या सहकारी संस्थेने व्यवसायासाठी जिनिंग आणि प्रेसिंग मशीनरी, इमारत, पाणीपुरवठा, ओटे, गोडाऊन आदींसाठी जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या संस्थेत एकूण एक हजार दोनशे सभासद शेतकर्‍यांनी गुंतवणूक केली असून, त्याचे भाग भांडवल जवळपास १५ लाख रुपयांच्या आसपास आहे. संस्थेला आजपावेतो मिळालेल्या नफ्यातून संस्थेची गुंतवणूक ही बाजारभावानुसार १0 कोटी रुपयांहूनही अधिक असण्याची शक्यता असल्याचे या संदर्भातील माहिती घेतल्यावरून कळले आहे. तथापि, अतिशय चांगल्या पद्धतीने चालत असलेला हा व्यवसाय गत चार वर्षांंपासून बंद पडला आहे. उल्लेखनीय बाब अशी, की मंगरुळपीरच्या सहकारी जिनिंग- प्रेसिंगमध्ये आधुनिक पद्धतीचे १२ डीआर जीन्स आहेत, तसेच आधुनिक पद्धतीचे प्रेसिंग युनिट स्थापण्यास संस्था सक्षम आहे.
वाशिम जिल्हय़ातील मानोरा येथे स्व. भीमराव पाटील सहकारी कापूस प्रक्रिया संस्थेने २५ फेब्रुवारी १९७१ ला १३ एकर जागेवर जिनिंगची स्थापना केली. त्याशिवाय या संस्थेने मानोरा तालुक्यातीलच पोहरादेवी येथे पाच एकर जागेत २४ मार्च १९८८ ला पाच जिन्सच्या आधारे जिनिंग सुरू केली होती.
संस्थेने व्यवसायासाठी जिनिंग मशीनरी, इमारत, पाणीपुरवठा, ओटे, गोडाऊन आदींसाठी जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक केली. हालाखीच्या परिस्थितीत जवळपास ७५६ शेतकर्‍यांनी आपले पैसे शेअर्सच्या माध्यमातून या व्यवसायात गुंतविले.
अनेक संकटांचा सामना करीत सहकारी जिनिंग भरभराटीस आणली; मात्र २00७ पासून हा सहकारी जिनिंग व्यवसायही बंद पडला आहे. भीमराव पाटील सहकारी संस्थेने जिनिंगमधील १८ रेचे (जिन्स) जीर्ण झाल्यामुळे प्रत्येकी १८ हजार २00 रुपये किमतीला विकले. त्यामुळे हा जिनिंग व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची आशा मावळल्यातच जमा आहे.

Web Title: Collapse of cooperative ging-press

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.