अंगणवाडी स्तरावर स्थलांतरीत मजुरांच्या मुलांची माहिती संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:43 AM2020-05-09T10:43:31+5:302020-05-09T10:43:39+5:30
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे पोषण आहारासंदर्भात मागणी नोंदविली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गावातून स्थलांतरीत कुटुंबातील बालकांना पोषण आहार मिळण्याचे संकेत असून, त्या दृष्टिकोनातून अंगणवाडी स्तरावर सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे पोषण आहारासंदर्भात मागणी नोंदविली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी ८ मे रोजी दिली.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व लॉकडाउन आहे. रोजगारानिमित्त अनेक कुटुंब मुंबई, पुणे, नाशिक यासह महानगरात गेले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट लक्षात घेता महानगरात कामानिमित्त गेलेले कामगार, मजूर हे आता आपापल्या जिल्ह्यात परतत आहेत. त्या कुटुंबातील बालकांची नावे अंगणवाडी केंद्रात नाहीत. त्यामुळे या बालकांना पोषण आहार मिळणे अशक्य आहे. लॉकडाउनमुळे मजुरांना अगोदरच काम नाही, त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यातच कुटुंबातील बालकांचे कुपोषणही वाढू शकते, ही शक्यता पाहता आता या स्थलांतरीत कुटुंबातील बालकांनाही पोषण आहार मिळण्याचे संकेत असून, त्या दृष्टीने सर्वेक्षण केले जात आहे.
सर्वेक्षण करण्याकामी अंगणवाडी सेविका !
प्रत्येक अंगणवाडी स्तरावर दाखल झालेल्या स्थलांतरीत कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना असल्याने अंगणवाडी सेविकांवर पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविली आहे.अंगणवाडी सेविकांकडून बालकांची माहिती गोळा केली जात आहे.
वरिष्ठांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात अंगणवाडी स्तरावर स्थलांतरीत कुटुंबातील बालकांची माहिती संकलित केली जात आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर शासनाकडे सादर केली जाईल तसेच पोषण आहारासंदर्भात मागणी नोंदविली जाईल.
-नितीन मोहुर्ले,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी