जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोरोनाच्या सद्य:स्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:42 AM2021-05-27T04:42:51+5:302021-05-27T04:42:51+5:30
वाशिम : कारंजा तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्ग सद्य:स्थिती तसेच हा संसर्ग नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. ...
वाशिम : कारंजा तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्ग सद्य:स्थिती तसेच हा संसर्ग नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २५ मे रोजी कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. तसेच तालुक्यात ग्रामस्तरीय विलगीकरण कक्ष सुरू करण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे, गट विकास अधिकारी कालिदास तापी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊसाहेब लहाने, नोडल अधिकारी डॉ. बढे, पोलीस निरीक्षक सतीश पाटील, धंदर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादासाहेब डोल्हारकर, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी तालुक्यातील कोरोना चाचण्या, लसीकरण मोहीम, कोरोना नियमांची अंमलबजावणी आदींविषयी आढावा घेतला. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे गावपातळीवर शाळा, समाज मंदिर अशा ठिकाणी विलगीकरण कक्ष सुरू करण्याची कार्यवाही तातडीने करावी. लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. गावपातळीवर सुरू करण्यात येणाऱ्या विलगीकरण कक्षामध्ये वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. या सुविधांअभावी रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षत घ्यावी. कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि तुळजा भवानी मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
०००
ई-पास तपासूनच जिल्ह्यात प्रवेश
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सध्या घट होत असली तरी भविष्यात हा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. पोलिसांनी जिल्हा सीमेवरील तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनाचा ई-पास तपासूनच जिल्ह्यात प्रवेश द्यावा. कोणत्याही व्यक्तीला ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश देऊ नये. तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची तपासणी नाक्यावरच कोरोना चाचणी करावी. विवाह, अंत्यसंस्कार यासारख्या कार्यक्रमांना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. याकरिता ग्रामस्तरीय समितीला आवश्यक सूचना द्याव्यात. जिल्ह्यात सध्या कडक निर्बंध लागू असले तरी काही दुकाने, आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या आस्थापनाधारक, दुकानदार तसेच भाजीपाला, फळविक्रेते यांची प्रत्येक पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिल्या.