जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला लसीकरण मोहिमेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:57+5:302021-06-17T04:27:57+5:30
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार नरसय्या कोंडागुरले, गट विकास अधिकारी हरिनारायण परिहार, पोलीस निरीक्षक जगदाळे, तालुका आरोग्य अधिकारी ...
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार नरसय्या कोंडागुरले, गट विकास अधिकारी हरिनारायण परिहार, पोलीस निरीक्षक जगदाळे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ. अरविंद भगत, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी लुंगे, गटशिक्षणाधिकारी पावणे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी कोरोना लसीकरण मोहीम, कोरोना चाचण्या, बाधितांचे संस्थात्मक विलगीकरण, मान्सूनपूर्व तयारी आदी बाबींचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी काही दिवसांत कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. तत्पूर्वी जास्तीत जास्त व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देऊन सुरक्षित करणे आवश्यक आहे. सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जात असून तालुक्यातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. ४५ वर्षांवरील किती व्यक्तींनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही, याची गावनिहाय माहिती घेऊन त्यांच्या लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचनाही दिल्या.
०००००
बॉक्स
लसीकरणाचे नियोजन करावे !
सध्या शेतीतील कामे सुरू असल्याने शेतकरी, मजूर वर्ग दिवसभर शेतीमध्ये असतो. त्यामुळे त्यांना सोयीस्कर अशा वेळेस सकाळी किंवा सायंकाळी लसीकरण सत्र आयोजित करावे. त्याविषयीची माहिती संबंधित गावांमध्ये एक-दोन दिवस अगोदर देऊन लसीकरणासाठी लोकांना आवाहन करावे, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण सध्या कमी असले तरी कोरोना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अधिक सतर्कपणे चाचण्या करून बाधितांचा शोध घ्यावा व त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवावे. तसेच मान्सून कालावधीत येणारे साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.