जिल्हाधिका-यांनी घेतला देगाव येथील परिस्थितीचा आढावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:56 AM2021-02-25T04:56:29+5:302021-02-25T04:56:29+5:30
यावेळी सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार अजित शेलार, पोलीस निरीक्षक एस.एम. जाधव, तालुका ...
यावेळी सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार अजित शेलार, पोलीस निरीक्षक एस.एम. जाधव, तालुका आरोग्य अधिकारी शंकर वाघ यांच्यासह शिक्षक, महसूल, आरोग्य विभागाचे कर्मचारी व शाळेचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते. बाधित विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधा, त्यांची आरोग्यविषयक सद्य:स्थिती, आढळलेली लक्षणे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी माहिती घेतली.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके आळीपाळीने २४ तास निवासी शाळेमध्ये तैनात ठेवावी. या पथकाने ठरावीक अंतराने सर्व विद्यार्थ्यांच्या शरीराचे तपामान, ऑक्सिजन पातळी तसेच त्यांना इतर काही लक्षणे असल्यास त्यांची तपासणी करून त्यानुसार तातडीने उपचार करावेत. शाळा व्यवस्थापनानेसुद्धा कर्मचाऱ्यांचे एक पथक २४ तास तैनात ठेवावे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होत असल्यास तातडीने आरोग्य पथकाच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर व योग्य आहार मिळेल, याची खबरदारी घ्यावी. गटशिक्षणाधिका-यांनी रोज सकाळी शाळेला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी आहेर म्हणाले, कोरोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोडीशी सर्दी आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी २४ तास आरोग्य पथके तैनात करण्यात येतील, असे सांगितले.