जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृती दलाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:49+5:302021-05-28T04:29:49+5:30

वाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ बनलेल्या १८ वर्षांच्या आतील बालकांची माहिती ३१ मेपर्यंत संकलित करावी, ...

The Collector took stock of the action force | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृती दलाचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृती दलाचा आढावा

Next

वाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ बनलेल्या १८ वर्षांच्या आतील बालकांची माहिती ३१ मेपर्यंत संकलित करावी, जेणेकरून अशा बालकांची काळजी घेण्यासोबतच त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे, योग्यप्रकारे संगोपन करण्याची कार्यवाही करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी सांगितले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गठित जिल्हा कृती दलाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात २७ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. जयश्री गुट्टे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, समितीचे सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्या १८ वर्षांच्या आतील बालकांच्या पालकांचा जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांनी अन्य जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांशी समन्वय साधून पार पाडावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गामुळे ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याने बालकांच्या व महिलेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असेल, तर त्या महिलेला उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा. कोरोनामुळे आई, वडिलांचा किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल, अशा बालकांची नावे व यादी तातडीने तयार करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड म्हणाले, कोविडमुळे ज्यांचे एक पालक मृत्यू पावले, अशी १६ बालके, तर ज्यांचे दोन्ही पालक मृत्यू पावले, अशी ५ बालके, अशी एकूण २१ बालकांची माहिती प्राप्त झाली आहे. चाईल्ड लाईनमार्फत गृहचौकशी करून त्यांना बालसंगोपन योजना मंजूर करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सर्व बालके नातेवाईकांकडे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश राऊत, संरक्षण अधिकारी आलोक अग्रहरी, एम. के. जऊळकर यांची उपस्थिती होती.

००००

बालकांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण

जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग आणि शहरी भागातील नगरपालिकांनी कोरोनामुळे पालक गमावल्यामुळे अनाथ बनलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी योग्यप्रकारे सर्वेक्षण करून त्या बालकांचा शोध घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी दिल्या.

नगरपरिषदेकडे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नोंद असल्याने त्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांची १८ वर्षांच्या आतील बालके अनाथ झाली असल्यास माहिती संकलित करून माहिला व बालकल्याण विभागाला द्यावी. तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्या कुटुंबाला भेट देऊन माहिती घ्यावी. गावपातळीवर अनाथ बालकांचा शोध घेण्यासाठी अंगणवाडी सेविकेने योग्य प्रकारे काम करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

००००००

Web Title: The Collector took stock of the action force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.