जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

By admin | Published: September 5, 2015 01:41 AM2015-09-05T01:41:46+5:302015-09-05T01:41:46+5:30

न्यायालयाचे आदेश; लेखी आश्‍वासनाने जप्ती टळली.

Collector's property seize order | जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

Next

वाशिम : जिल्हय़ातील मानोरा तालुक्यातील चिखली येथील रहिवाशी बंडू जेमला आडे व धर्मराज बंडू आडे या पिता-पुत्राच्या मालकीच्या वडगाव शिवारातील संपादीत केलेल्या शेतजमिनीचा मोबदला वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची ३९.५७ लाख रुपयांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचा आदेश मंगरुळपीर येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) डॉ. संतोष जयस्वाल यांनी २ सप्टेंबर रोजी दिला. न्यायालयाचा सदर जप्ती आदेश घेऊन बेलिफ व संबंधित शेतकरी पिता-पुत्र यांनी वकिलांना सोबत घेऊन ३ सप्टेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच अधिकार्‍यांची एकच तारांबळ उडाली; मात्र जिल्हाधिकारी अमरावती येथे दौर्‍यावर गेले असल्याने जप्तीची कारवाई होऊ शकली नाही. मानोरा तालुक्यातील चिखली येथील शेतकरी बंडू आडे व धर्मराज आडे यांच्या मालकीची वडगाव शिवारातील अनुक्रमे ५ हेक्टर 0.६ आर व १ हेक्टर ५४ आर या शेतजमिनी चिखली लघु पाटबंधारे अंतर्गत बुडीत क्षेत्राकरिता शासनाने सन १९९६-९७ मध्ये संपादीत केली होती. त्या जमिनीला शासनाने योग्य मोबदला न दिल्यामुळे या दोन्ही पिता-पुत्रांनी वाढीव मोबदला मिळण्याकरिता वाशिम येथील न्यायालयात अनुक्रमे ८९-२00५ व ९0-२00५ प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात न्यायालयाने २७ जून २0११ रोजी निकाल देऊन दोन्ही प्रकरणातील जमिनीचा मोबदला वाढवून देण्याचा आदेश दिला होता; मात्र सदर दोन्ही प्रकरणातील निकालाविरुद्ध शासनाच्यावतीने उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात अपिल दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयात दोन्ही शेतकर्‍यांच्यावतीने दिग्रस (यवतमाळ) येथील अँड. गुंजन राजेंद्र कोठारी यांनी शेतकर्‍यांची बाजू सर्मथपणे मांडली असता उच्च न्यायालयाने अनुक्रमे ९ सप्टेंबर २0१४ व १ डिसेंबर २0१४ रोजी सदरचे दोन्ही प्रकरणे खारीज करुन वाशिम न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. संबंधित शेतकर्‍यांना मोबदला देण्याचा न्यायालयाचा आदेश असताना शासनाने दोन्हीही शेतकर्‍यांना अद्यापपर्यंंत वाढीव मोबदल्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे या शेतकर्‍यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी दरखास्ती दाखल केली होती. सदरच्या दोन्ही दरखास्ती मंगरुळपीर येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात स्थानांतरीत झाल्यानंतर शासनाला भरपूर वेळ देण्यात आला होता. तरीही शासनाकडून मोबदला न मिळाल्यामुळे मंगरुळपीर येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर डॉ. संतोष जयस्वाल यांनी शेतकरी बंडू आडे यांची वाढीव मोबदल्याची रक्कम ३९ लाख ५७ हजार ५१८ रुपये व धर्मराज आडे यांची वाढीव मोबदला रक्कम रुपये ७ लाख २६ हजार ९0९ च्या वसुलीकरिता जंगम मालाचे जप्तीचा आदेश २ सप्टेंबर २0१५ रोजी पारीत केला. या आदेशान्वये ३ सप्टेंबर २0१५ रोजी शेतकरी बंडू आडे व धर्मराज आडे या दोघांनी वाशिम न्यायालयातील बेलीफ मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय व कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे वाशिम यांच्या कार्यालयावर जंगम जप्तीचे वॉरंट घेऊन गेले असता, दोन्ही कार्यालयातील अधिकार्‍यांची एकच तारांबळ उडाली.

Web Title: Collector's property seize order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.