महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही होणार कोरोना चाचणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:38 AM2021-02-12T04:38:53+5:302021-02-12T04:38:53+5:30
मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले होते. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून ...
मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले होते. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. या दरम्यान जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. पाचवी ते बारावीनंतर राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यापूर्वीच केली. त्यानुसार जिल्ह्यात पूर्वतयारी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्राध्यापक, कर्मचारी यांच्याप्रमाणेच विद्यार्थ्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित एकूण २६ महाविद्यालये असून, २४ हजारांवर विद्यार्थीसंख्या आहे. महाविद्यालयांच्या परवानगीने कोरोना चाचणीसाठी महाविद्यालयस्तरावर शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे.
००००
कोट बॉक्स
शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. सर्व प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांचीसुद्धा कोरोना चाचणी होणार आहे. महाविद्यालयांच्या परवानगीने कोरोना चाचणीसाठी महाविद्यालयस्तरावरसुद्धा कॅम्पचे आयोजन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
- शण्मुगराजन एस.
जिल्हाधिकारी, वाशिम
००००
विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. महाविद्यालयांनी परवानगी दिली तर महाविद्यालय स्तरावर कॅम्पचे आयोजन केले जाईल.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
००००
महाविद्यालये सुरू करण्याची पूर्वतयारी केली जात आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाविद्यालय सुरू केली जाईल. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणार असेल तर ही बाब स्तुत्य आहे.
- प्रा. मिलनकुमार संचेती,
प्राचार्य, आर.ए. कॉलेज, वाशिम
०००
एकूण महाविद्यालये २६
एकूण विद्यार्थी २४३२६
०००००