अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी महाविद्यालयांची कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:58 AM2020-08-31T11:58:04+5:302020-08-31T11:58:25+5:30

कोरोनाच्या काळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थी आणि प्राध्यापकांची डोकेदुखी वाढविण्याचा प्रकार असल्याचा सूर शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

College workout for final exam preparation! | अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी महाविद्यालयांची कसरत !

अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी महाविद्यालयांची कसरत !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. जिल्ह्यातील कोरोनाचा धोका लक्षात घेता निमशहरी आणि ग्रामिण भागातील महाविद्यालयांना मात्र विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कोरोनाच्या काळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थी आणि प्राध्यापकांची डोकेदुखी वाढविण्याचा प्रकार असल्याचा सूर शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेताच निकाल जाहीर करणे व पदवी प्रमाणपत्र देणे याला मात्र अनेकजणांचा आक्षेप देखील होता. कोरोना काळात परीक्षा कशा घ्याव्या व त्यासाठी यंत्रणा कशी उभारावी याबाबत विविध मते मतांतरे होती. यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने निर्वाळा करीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असून, याची पूर्वतयारी करताना विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांची दमछाक होणार आहे. कोरोनामुळे बाहेर ठिकाणचे विद्यार्थी आपापल्या गावी परतले आहेत. परीक्षेसाठी शहरात भाड्याने घर देताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोरोना काळात शक्यतोवर भाड्याने घरही मिळणार नाही. त्यामुळे राहावे कसे? या प्रश्नाने विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार असल्याने एका वर्गात किमान १५ ते २० विद्यार्थीच बसु शकणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची एकाच वेळी सोय करताना दमछाक होईल, यात शंका नाही.


बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी आपले महाविद्यालय सज्ज आहे. कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर आवश्यक उपाययोजना परीक्षा केंद्रावर करण्यात येतील. विद्यार्थ्यांना बसण्याची व फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी हॉल तसेच खोल्या अशी पुरेशी जागा महाविद्यालयाकडे उपलब्ध आहे. शासनाच्या आदेशानुसार चोख व्यवस्था ठेवू.
- डॉ.मिलनकुमार संचेती,
प्राचार्य राजस्थान आर्य कॉलेज वाशिम


कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून बसण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. शासनाच्या आदेशानुसार मिळालेल्या नियमांचे महाविद्यालयाकडून पालन करण्यात येतील. त्यादृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू करणार आहोत.
-एस.एन.शिंदे, प्रभारी प्राचार्य
सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम.


विद्यापीठ आणि शासनाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास आपल्या महाविद्यालयाची तयारी आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे आवश्यक खबरदारी घेवूनच विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
-किशोर वाहाणे, उपप्राचार्य
रामराव सरनाईक समाजकार्य कॉलेज वाशिम


कोरोना परिस्थितीत परीक्षा मुळीच घ्यायला नकोत. एक तर अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. लॉकडाऊनमुळे आॅनलाईन वर्ग झाले.परंतु आॅनलाईन वर्गात नेटवर्कचा खोळंबा, संवादातील विसंगती आदी कारणामुळे परीक्षेची पूर्ण तयारी झाली नाही. शहरात राहावे कुठे हाही महत्वाचा प्रश्न आहे.
- सचिन सुनिल ईवरकर
बी.बी.ए. तृतीय वर्ष, रिसोड


उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी अखेर करावीच लागणार आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात येईल.फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार असल्याने काटेकोरपणे नियम पाळण्यात फारशी अडचण जाणार नाही.
- जी.एस.कुबडे, प्राचार्य
मातोश्री शांताबाई गोटे कॉलेज वाशिम


कोरोनाच्या पृष्ठभूमिवर परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा होता कामा नये. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या निर्देशानुसार व शासनाने कोरोनासंदर्भात आखुन दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन महाविद्यालयाने करुन परीक्षा केंद्रावर सर्व व्यवस्था चाख ठेवावी. बाहेरगावचे विद्यार्थी शहरात कुुठे राहतील, हाही महत्वाचा प्रश्न आहे.

- पुजा दिलीप हलगे
बी.कॉम. तृतीय वर्ष, रिसोड

 

Web Title: College workout for final exam preparation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.