२८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंदच राहणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:26+5:302021-02-15T04:35:26+5:30
मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले होते. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून ...
मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले होते. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. यादरम्यान जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. पाचवी ते बारावीनंतर राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यापूर्वीच केली. जिल्ह्यात अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित एकूण २६ महाविद्यालये असून, २४ हजारांवर विद्यार्थीसंख्या आहे. जिल्ह्यात महाविद्यालये सुरू करण्याचे पूर्वनियोजन केले जात असतानाच, कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख उंचावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पूर्वीप्रमाणेच २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिका-यांनी काढला. त्यानंतर कोरोनाविषयक परिस्थितीचा विचार करून महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.