विद्यार्थ्यांना दिलासा; शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम मिळणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:54+5:302021-08-13T04:46:54+5:30
वाशिम : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी गतवर्षी प्रवेश घेतलेल्या राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आता संपली असून, लवकरच शिक्षण शुल्क व ...
वाशिम : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी गतवर्षी प्रवेश घेतलेल्या राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आता संपली असून, लवकरच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्तीची रक्कम मिळणार आहे.
राज्य शासनाच्या वतीने राज्यातील शासन मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागामार्फत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूती देण्यात येते. गतवर्षापासून कोरोनामुळे शासनाच्या विविध योजनांसाठी पुरेशा प्रमाणात निधी मिळत नसल्याने अंमलबजावणी काही अंशी प्रभावित होत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी गतवर्षी प्रवेश घेतलेल्या राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीदेखील रखडली होती. योजनेसाठी शासनाने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली. मात्र, निधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची (शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती) प्रतीक्षा लागून आहे. चालू आर्थिक वर्षासाठी शासनाने १८७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आयुक्तालयाला वितरित करण्यात आला. त्यामुळे शिष्यवृतीची प्रलंबित रक्कम लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्पष्ट केले.