जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी समिती गठित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:55 AM2021-02-20T05:55:35+5:302021-02-20T05:55:35+5:30
जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश ...
जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जि.प. उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, सभापती चक्रधर गोटे, वनिता देवरे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत येणाऱ्या काही मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे, काही मालमत्तांची नोंद नाही. याप्रकरणी मालमत्तेचा शोध घेणे, अतिक्रमण काढण्याची कार्यवाही व्हावी याकरीता प्रत्येक तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यासह पंचायत समितीच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामध्ये विकासात्मक कामे व अन्य उपक्रम, योजनांबाबत समन्वय साधण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर नोडल अधिकारी नेमण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला. ग्रामीण रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली तसेच कोरोनाविषयक परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी ग्रामीण भागात व्हावी याकरिता स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्या असे निर्देशही जि.प. अध्यक्ष ठाकरे यांनी दिले. ड्रोनद्वारे ग्रामीण भागात गावठाणांचे सर्वेक्षण होणार आहे. या प्रक्रियेची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिली.