वाशिम बाजार समितीत पावसामुळे भिजला लाखो रुपयांचा शेतमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:27 PM2018-06-03T14:27:04+5:302018-06-03T14:27:04+5:30
वाशिम: तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल, तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने पावसात भिजला.
वाशिम: तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे बाजार समितीत विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल, तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने पावसात भिजला. यात सर्वाधिक प्रमाण सोयाबीनचे असल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचा लिलाव करण्यासह तो विक्री होऊन उचल होईपर्यंत सुरक्षीत राहावा म्हणून ११ शेड उभारले आहेत. यापैकी ६ शेडमध्ये नाफेड मार्फत खरेदी केलेला शेतमाल ठेवण्यात आला. खरिप हंगाम तोंडावर आल्याने बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली असताना आणि शेडमध्ये पुरेशी जागा नसताना तो शेतमाल बाजार समितीच्या खुल्या जागेत उघड्यावर ठेवावा लागत आहे. लिलाव झाल्यानंतर व्यापारी मालाची मोजणी करून पोती भरतात. शनिवारी हा व्यवहार सुरू असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांना सावरायची संधीच मिळाली नाही आणि लाखो रुपयांचा शेतमाल पावसात पूर्णपणे भिजला. यावेळी खाली मोकळा ठेवलेला शेतमाल सावडण्यासह भरलेली पोती उचलण्यासाठी व्यापारी, शेतकरी आणि हमा मंडळीची चांगलीच तारांबळ उडाली होती. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या पृष्ठभूमीवर उघड्यावर ठेवलेला शेतमाल पावसामुळे भिजण्याची भिती असल्याने आडते आणि व्यापारी मंडळाने जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदन सादर करून नाफेडच्या खरेदीचा शेडमधील माल उचलण्याच्या सुचना देण्याची मागणीही केली होती. दरम्यान, या प्रकाराची दखल बाजार समितीच्या प्रशासकांनी घेतली असून, पावसामुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये यासाठी नाफेडचा शेडमधील शेतमाल उचलण्याच्या सुचना खरेदी विक्री संस्थेला त्यांच्यावतीने देण्यात आल्या आहेत, तसेच पुढे शेतकरी, व्यापाऱ्यांच्या शेतमालाची सुरक्षा करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आश्वासन बाजार समितीचे मुख्य प्रशासक बंडू पाटील महाले यांनी दिले आहे.