न उगवलेल्या बियाण्यांचा मोबदला प्रलंबीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 04:03 PM2020-09-06T16:03:35+5:302020-09-06T16:03:42+5:30
काही कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल केले असले तरी, उर्वरित कंपन्यांवरील कारवाई शुन्यच आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: राज्यात यंदाच्या हंगामात लाखावर शेतकऱ्यांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला. त्यांना दुबार पेरणी करावी लागली. कृषीमंत्र्यांनी शेतकºयांना तातडीने बियाणे बदलून देण्याचे आदेशही दिले. तथापि, तीन महिने उलटले असतानाही हजारो शेतकºयांना बियाणे बदलून मिळाले नाही किंवा मोबदलाही मिळालेला नाही. त्यातच काही कंपन्यांवर न्यायालयीन खटले दाखल केले असले तरी, उर्वरित कंपन्यांवरील कारवाई शुन्यच आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या घटना राज्यभरात घडल्या. त्यामुळे लाखो शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे त्यांचे परिश्रम आणि खर्चात वाढ झालीच. शिवाय दुबार, तिबार पेरणीत वेळ गेल्याने उत्पादनावरही परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात न उगवलेल्या बियाण्यांच्या प्रकाराची दखल कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली आणि पंचनाम्यांच्या अहवालाची प्रतीक्षा न करता शेतकºयांना तात्काळ बियाणे बदलून पेरणी सोयीची करण्याचे आदेश दिले. तथापि, राज्यभरात कृषी विभागाने शेतकºयांच्या तक्रारीनुसार पंचनाम्यांचे सोपस्कार सुरूच ठेवले. त्यात काही कंपन्यांवर कोर्ट केसेस (न्यायालयीन खटले) दाखल केले आहेत. आता त्याचा निकाल लागण्यास बराच विलंब लागणार आहे. शिवाय उर्वरित हजारो शेतकºयांना अद्याप कंपनीकडून बदली बियाणेही देण्यात आलेले नाहीत आणि खरीप हंगाम संपत आला असताना शेतकºयांना बियाण्यांचा खर्च म्हणून मोबदलाही मिळालेला नाही. राज्यशासनाने या प्रकाराची दखल घेऊन शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी राज्यभरातील शेतकरी करीत आहेत.
काजळेश्वर परिसरात यंदा ४० पेक्षा अधिक शेतकºयांना निकृष्ट बियाण्यांचा फटका बसला. त्यामुळे त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. काही ठिकाणी कृषी विभागाने पंचनामेसुद्धा केले; परंतु आता सोयाबीन काढणीवर आले असताना शेतकºयांना बदली बियाणे मिळाले नाहीत किंवा संबंधित कंपनीकडून मोबदलाही मिळू शकला नाही.
-नितिन उपाध्ये,
शेतकरी, काजळेश्वर ता. कारंजा