ऑटोचालकांची माहिती संकलित; मदत कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:26+5:302021-05-08T04:43:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कठोर करतानाच परवानाधारक ऑटोचालकांना प्रत्येकी दीड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कठोर करतानाच परवानाधारक ऑटोचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याची घोषणा १३ एप्रिल रोजी केली होती. यानुसार, महसूल विभागाने ऑटोचालकांची माहितीही मागितली. मात्र, अद्याप ऑटोचालकांना दीड हजारांची मदत मिळणे बाकी आहे. जिल्ह्यात परवानाधारक जवळपास ३,४०० ऑटोचालक आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १५ मेपर्यंत राज्य शासनाने निर्बंध कठोर केले आहेत. या दरम्यान, गोरगरीब नागरिक, ऑटोरिक्षाचालकांना आर्थिक दिलासा म्हणून परवानाधारक ऑटोचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे राज्य शासनाने यापूर्वीच जाहीर केले. जिल्ह्यात जवळपास साडेसात हजार ऑटो असून, यापैकी जवळपास ३,४०० ऑटो हे परमिटवाले आहेत. त्यांना दीड हजार रुपयांचा लाभ मिळण्यासाठी मध्यंतरी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून महसूल विभागाने माहितीही घेतली, असे उपप्रादेशिक परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले. २० दिवसानंतरही ऑटोचालकांना दीड हजारांची मदत मिळाली नाही. मदत केव्हा मिळणार, याकडे लक्ष लागून आहे.
००००
(प्रतिनिधी)
मदत लवकर मिळावी...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध कडक केले आहेत. ऑटोचालकांना प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. शासनाने जाहीर केलेली मदतही मिळाली नाही. दीड हजार रुपये केव्हा मिळणार, याकडे लक्ष लागून आहे.
- गजानन लाड
......
संचारबंदीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाही. त्यामुळे ऑटोमध्ये प्रवाशी मिळत नाहीत. शासनाने जाहीर केलेले दीड हजार रुपये ऑटोचालकांना लवकरात लवकर मिळावे, अशी आमची मागणी आहे.
- सीताराम वाठ
.................
ऑटोचालकांना दिलासा म्हणून शासनाने दीड हजार रुपये जाहीर केले, परंतु अद्यापही ही मदत मिळालेली नाही. सरसकट ऑटोचालकांना मदत मिळायला हवी. मदत केव्हा मिळणार याची प्रतीक्षा आहे.
- विनोद अवचार
.....................
परमिट व विनापरमिट असा भेदभाव न करता सर्व ऑटोचालकांना दीड हजारांची मदत मिळणे अपेक्षित आहे. परमिटवाल्या ऑटोचालकांनाच अजून मदत मिळाली नाही, तेव्हा परमिट नसलेल्या ऑटोचालकांना मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न आहे.
- गौरव पाटील
..
परमिटधारकांची संख्या ३,४००
परमिट नसलेले ऑटोचालक ३,१००