एम.डी.पदवी बनावट असल्याची तक्रार; कारंजात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:21 AM2017-12-08T02:21:16+5:302017-12-08T02:26:36+5:30
कारंजा लाड : कारंजा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. नवल सारडा यांच्याकडे असलेली अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सेशील येथून प्राप्त केलेली एम.डी.ची पदवी बनावट असल्याची तक्रार किरण क्षार यांनी कारंजा शहर पोलिसांत ५ डिसेंबरला केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, सदर प्रकरण पोलिसांनी चौकशीत ठेवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कारंजा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. नवल सारडा यांच्याकडे असलेली अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सेशील येथून प्राप्त केलेली एम.डी.ची पदवी बनावट असल्याची तक्रार किरण क्षार यांनी कारंजा शहर पोलिसांत ५ डिसेंबरला केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, सदर प्रकरण पोलिसांनी चौकशीत ठेवले आहे.
तक्रारीनुसार, किरण क्षार व डॉ. मनोज काळे यांनी माहितीच्या अधिकारात कारंजा शहरातील काही डॉक्टरांच्या आय.एम.ए.ची प्रत व नोंदणी क्रमांक, पदवीविषयी ९ नोव्हेंबर रोजी कारंजा तालुका आरोग्य अधिकारी (पंचायत समिती) यांच्याकडे माहितीच्या अधिकारान्वये मागितली होती. यामध्ये शहरातील डॉ. नवल सारडा, डॉ.नीलेश खोतकर, डॉ. मिलिंद धांडे, डॉ. अजय कांत, डॉ. शादरुल डोणगावकर, डॉ. दिलीप धोपे, डॉ. पंकज काटोले या डॉक्टरांचा समावेश होता. तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, डॉ. सारडा यांची एम.डी.ची पदवी देणारे युनिव्हर्सिटी ऑफ सेशील हे विद्यापीठ अस्तित्वात नसल्याचे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले. डॉ. सारडा आपल्या नावासमोर एम.डी. पदवी लिहून नागरिकांची दिशाभुल करीत आहेत, असा आरोप किरण क्षार यांनी तक्रारीत केला. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सदर अमेरिकन विद्यापीठाच्या एम. डी. पदवीला समकक्षता प्रदान करण्यात आली नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर तक्रार कारंजा शहर पोलिसांनी चौकशीत ठेवली आहे. या तक्रारीमुळे कारंजा शहरात एकच खळबळ उडाली.
मी कारंजा येथे मागील दहा वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबई आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून रितसर मान्यता मिळवून एम.बी.बी.एस, डी.सी.एच, एफ.सी.पी.एस या पात्रतेच्या आधारे बालरोग संदर्भात वैद्यकीय सेवा देत आहे. याशिवाय अतिरिक्त पात्रता म्हणून २00७ मध्ये अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ सेशीलची एम.डी. ची पदवी सर्व परीक्षा व प्रात्याक्षिके सदर युनिव्हर्सिटीकडे सादर करून ही पदवी मिळवली. या अतिरिक्त वैद्यकीय पात्रतेच्या आधारावर बालरोग तज्ज्ञ म्हणून मी काम करत नाही. जर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी सदर अतिरिक्त पदवीच्या नावासमोर उल्लेख टाळण्याची सूचना केल्यास त्या सूचनेचे पालन करण्यात येईल.
- डॉ. नवल सारडा, कारंजा
डॉ. नवल सारडा यांची पदवी बनावट असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. या तक्रारीसंदर्भात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून अहवाल मागवून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
-एम.एम.बोडखे, ठाणेदार कारंजा