संगणक परिचालकांच्या आंदोलनामुळे महा ई-संवाद कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 02:17 PM2019-08-25T14:17:12+5:302019-08-25T14:17:17+5:30
वाशिम जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे वनमंत्र्यांच्या महा ई -संवाद कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला, तसेच प्रधानमंत्री किसान मानधन योजनेवरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मागण्यांबाबत शासन उदासीन असून, प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत संगणक परिचालक हे पद कायमस्वरूपी भरण्याची आवश्यकता असताना शासनाने या महत्वाच्या निर्णयाकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. शासनाच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील संगणक परिचालकांनी १९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील संगणक परिचालकही सहभागी आहे. अशात हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवार २३ आॅगस्ट २०१९ रोजी दुपारी ३ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी ‘महा ई संवाद’अंतर्गत थेट संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मुनगंटीवार थेट चर्चा करणार होते; परंतु वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत संगणक परिचालकांच्या कामबंद आंदोलनामुळे बहुतांश ग्रामपंचायतीत या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला. त्यातच शासनाची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या किसान मानधन योजनेच्या नोंदणीवरही याचा परिणाम होत असून, ग्रामस्थांनाही महत्त्वाची कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन राहणार सुरू !
राज्य शासन संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांबाबत गंभीर नाही. वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करून आणि वारंवार आंदोलने करूनही शासनाकडून दखल घेण्यात येत असल्याने संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून, मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे संगणक परिचालकांनी सांगितले आहे.