आता तक्रारींचा ऑनलाइन निपटारा
By admin | Published: July 13, 2016 02:25 AM2016-07-13T02:25:48+5:302016-07-13T02:25:48+5:30
चांगल्या कामांची दखल : व्हाट्सअप क्रमांक जाहीर.
वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गतच्या तक्रारींचा ऑन दी स्पॉट निपटारा करण्यासाठी तसेच चांगल्या कामांची दखल घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने एक व्हाट्सअप क्रमांक जनसेवेत आणला आहे. या ८९७५७६७७४९ क्रमांकावर तक्रार नोंदविल्यानंतर तातडीने दखल घेत निपटारा करण्यात येईल, अशी माहिती स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिली. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्ह्यात नवनवीन उपक्रमांना सुरुवात केली असून, हा लोकांना अधिक चांगली सेवा देण्याच्या हेतूने स्वच्छ भारत मिशनचा व्हॉट्सअप क्रमांक सुरु करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना हा नंबर पंचायत समितीच्या दर्शनीय भागात प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील स्वच्छतेबाबतच्या यशोगाथांची माहिती जिल्हा कक्षाला त्वरित मिळावी आणि लोकांच्या या अभियानाबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी या नंबरवर लेखी, छायाचित्र, रेकॉर्डिंग किंवा शुटींगच्या स्वरुपात टाकणे अपेक्षित आहे. या नंबरवर फोन न करता वरील स्वरुपातच नागरिकांनी संवाद करावा, असे आवाहन महेश पाटील यांनी केले आहे.