बीटी वाणाच्या ‘लाईव्ह सॅम्पल’चे संकलन पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:55 PM2018-09-15T12:55:07+5:302018-09-15T12:55:20+5:30
वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात कपाशीच्या झाडांची जिवंत पाने तोडून ‘लाईव्ह सॅम्पल’ अर्थात जिवंत नमुन्यांचे संकलन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव सुरू असल्याने बीटी वाणाचा दर्जा तपासणे आवश्यक झाले होते. यासाठी वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात कपाशीच्या झाडांची जिवंत पाने तोडून ‘लाईव्ह सॅम्पल’ अर्थात जिवंत नमुन्यांचे संकलन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून, बियाण्याचे वाणच सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव होणे, ही बाब गंभीर आहे. या प्रकारामुळे बीटी बियाण्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे बोंडअळीचा प्रादूर्भाव नेमका का होत आहे. या कारणाचा शोध घेणे आवश्यक होते. यासाठी अमरावती विभागात बीटी वाणाच्या कपाशीची जिवंत पाने तोडून नमुण्यांचे संकलन करण्याची प्रक्रिया करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात ७ सप्टेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती. गुणनियंत्रक विभागाच्या मार्गदर्शनात १० जणांच्या चमूकडून कपाशीच्या झाडांची पाने तोडून त्यांचे नमुने तयार करण्यात आले. बीटी कपाशीच्या प्लांटमधून लाईव्ह सॅम्पलसाठी ९० झाडांच्या शेंड्याचा भाग सोडून त्याखालची परिपक्व झालेली प्रत्येकी तीन पाने तोडण्यात यासाठी तोडण्यात आली. या अंंतर्गत एका प्लांटमधून २७० पानांचे एक ‘सॅम्पल’ या प्रमाणे सहा तालुक्यातून १६२० पानांचे सहा नमुने तयार करण्यात आले. हे नमुने थर्मोेकोलच्या डब्यात ‘आईस पॅड’मध्ये टाकून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.