शाळांचे निर्जंतुकीकरण पूर्ण; शासन निर्देशांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:57 AM2020-08-26T11:57:37+5:302020-08-26T11:57:45+5:30
१ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होतील की नाही याबाबत शिक्षकांसह पालकांमध्ये चर्चा झडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता पूर्ण झाली असून, १ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होतील की नाही याबाबत शिक्षकांसह पालकांमध्ये चर्चा झडत आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. ३१ आॅगस्टपर्यंत कोणतेही वर्ग सुरू करू नये, असे स्पष्ट निर्देश केंद्र व राज्य शासनाचे आहेत. तत्पूर्वी सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करून शिक्षण विभाग १ सप्टेंबरसाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जिल्हा परिषद ७७५ शाळा असून, यापैकी ३५० च्या आसपास शाळा ‘क्वारंटीन’साठी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात या शाळा स्थानिक प्रशासनाने मुख्याध्यापकांच्या ताब्यात दिल्या. त्यानंतर ३५० शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करून शाळेचे प्रशासकीय कामकाज सुरू करण्यात आले. सध्या प्रशासकीय कामकाजासाठी शाळा मात्र सुरू आहेत, मात्र कोणतेही वर्ग सुरू नाहीत. या शाळेत अतिजोखीम गटातील जसे मधुमेह, उ्च्चदाब आजारी शिक्षक, महिला शिक्षकांना शक्यतोवर बोलाविण्यात येऊ नये, अत्यावश्यक असेल तरच या गटातील शिक्षकांना बोलाविण्यात यावे, कोणत्या शिक्षकाला कोणत्या दिवशी शाळेत बोलवायचे याचा निर्णय मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आलेला आहे. दरम्यान, आता हळूहळू ‘अनलॉक’ ची प्रक्रिया सुरू असून, आंतरजिल्हा बससेवा, दुकाने सुरू करण्याच्या वेळाही वाढविण्यात येत आहेत. त्यामुळे १ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होतात की नाही, वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे नेमके कोणते धोरण राहिल, याबाबत शिक्षक व पालकांमध्ये चर्चा रंगली.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तुर्तास तरी पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करू नयेत. वर्ग सुरू करायचे असतील तर संबंधित शाळांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. विठ्ठल गोटे,
पालक, वाशिम
कोरोनामुळे वर्ग सुरू करताना आवश्यक ती खबरदारी शाळांना घ्यावी लागणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, सॅनिटाईजची व्यवस्था, मध्यान्ह भोजन व्यवस्था या सर्व बाबींचा विचार करूनच वर्ग सुरू करावे.
- मिलिंद गायकवाड,
पालक, वाशिम
३१ आॅगस्टपर्यंत वर्ग सुरू न करण्याच्या सूचना आहेत. १ सप्टेंबरपासून वर्ग सुरू होणार की नाही याबाबत सध्यातरी स्पष्टता नाही. तत्पूर्वी जि.प. शाळांचे निर्जंतुकीकरण करून शिक्षक सज्ज आहेत. शासनाचा निर्णय मान्य राहिल.
- सतीश सांगळे,
शिक्षक, वाशिम