अमरावती विभागातील बियाणे नमुन्यांची तपासणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:37 PM2018-08-06T12:37:06+5:302018-08-06T12:40:33+5:30
वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांकडून नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांकडून नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. विविध पिकांच्या बियाण्यांच्या एकूण ३५ प्रकारच्या नमुन्यांचा यात समावेश आहे. प्रयोगशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे गुणनियंत्रक विभागाकडून आता अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गतवर्षी बोंडअळीच्या प्रकोपामुळे कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदाच्या हंगामात बनावट बीटी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान व पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी गुणनियंत्रण विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. बीटी कपाशी बियाण्यासह नॉन बिटी कपाशी आणि इतरही पिकांच्या विविध वाणांचे नमुनेही संकलित करण्यात आले. हे बियाणे महाराष्ट्र बी-बियाणे नियम, २००९ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ मधील कलम १० व ११ अन्वये केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर संचालकांकडे २५ मे रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले. यात अंकुर कंपनीच्या मलकापूर येथील बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातून एचटी जीन तपासणीकरिता घेण्यात आलेल्या संकरित कापूस ३०२८- बीजी-२ या वाणाचा नमुना सदोष आढळला होता. त्यामुळे संबंधित कंपनीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. आता उर्वरित बियाण्यांच्या विविध वाणांची तपासणीही पूर्ण झाली असून, यासंदर्भातील माहिती अमरावती विभागीय कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या संचालकांकडून प्राप्त अहवालाची तपासणी गुणनियंत्रक विभाग करून त्यावर एक सर्वंकष अहवाल तयार करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातून बीटी, नॉन बीटी कपाशीसह इतर पिकांच्या बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. ही तपासणी पूर्ण होऊन विभागीय स्तरावर त्याबाबतचा रिपोर्ट आला आहे. सोमवारी याबाबत विभागीय कृषी संचालक कार्यालयात त्या रिपोर्टची पाहणी करण्यात येणार आहे, त्यानंतरच अहवाल सादर करण्यात येईल.
- डी. आर. साठे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, वाशिम.