बांधकामाधीन सिंचन प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:04+5:302021-02-07T04:37:04+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शनिवार, ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या वाशिम जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शनिवार, ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या वाशिम जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या वेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता एम.के. तायडे, कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले, अडाण नदीवर घोटाशिवणी, सत्तरसावंगा आणि बोरव्हा येथे बॅरेज निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक असल्याने हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणार आहे. पैनगंगा नदीवर सहा बॅरेज उभारण्याची मागणी आहे. या नदीवरील कळमगव्हाण प्रकल्प रद्द झाला आहे. त्यासाठी मंजूर असलेले पाणी मसलापेन येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन बॅरेजसाठी वापरण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. त्यामुळे पैनगंगा नदीवरील एका बॅरेजचा प्रश्न मार्गी लागेल, उर्वरित ५ बॅरेजच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या चाचपणी करावी, अशा सूचना जलसंपदामंत्र्यांनी केल्या.
सोनल मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचे वितरण योग्य रीतीने होऊन त्या पाण्याचा सिंचनासाठी वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कालव्याच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत शासनाला सादर करावा. तसेच पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील काही झाडे, विहिरी व घरांचा मोबदला देण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. याबाबतचा प्रस्तावही तातडीने नियामक मंडळापुढे सादर करावा. मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी प्रकल्पाचे साडेपाच किलोमीटरचे कालवे रद्द करून उपसा सिंचन वाढविण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. सदर प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना पाटील यांनी या वेळी दिल्या.
.....................
बाॅक्स :
बॅरेजनिर्मितीस मंजुरी मिळावी - ठाकरे
जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे म्हणाले, तांत्रिक कारणामुळे मंगळसा प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्याऐवजी या प्रकल्पाची व्याप्ती कमी करून हा प्रकल्प करण्यात यावा. तसेच अडाण नदीवरील तीन बॅरेजच्या निर्मितीसाठी लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.