‘जलयुक्त’ची अपूर्ण कामे विनाविलंब पूर्ण करा!
By Admin | Published: May 8, 2017 01:39 AM2017-05-08T01:39:36+5:302017-05-08T01:39:36+5:30
जिल्हाधिका-यांचे निर्देश; मालेगाव तालुक्यातील १४ कामांना भेटी.
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानातून मालेगाव तालुक्यात सुरु असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रविवार, ७ मे रोजी नऊ गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी १४ कामांची पाहणी केली. ३१ मे पूर्वी जलयुक्त शिवार अभियानाची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासोबतच कामाचा दर्जा कायम राखण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार राजेश वाजीरे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे अतिरिक्त संचालक शाह, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक बळवंत गजभिये, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, जिल्हा परिषद लघूसिंचन विभागाचे उपअभियंता बोके यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
अमानी येथे कृषी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व जिल्हा परिषद लघूसिंचन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामास जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी भेट दिली. करंजीसह पांगरी कुटे, पिंपरी येथे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुनर्भरणचर व रिचार्ज शाफ्टच्या कामांची त्यांनी पाहणी केली. यापैकी काही ठिकाणी ह्यबर्मह्ण कमी सोडण्यात आला असून तो वाढविण्याच्या व दोन पुनर्भरण चरमधील अंतर कमी करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्या.
जिल्हा परिषद लघूसिंचन विभागाच्यावतीने करंजी येथे सुरु असलेल्या नाला खोलीकरण व सिमेंट नाला बांधाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. तसेच नागरतास व किन्हीराजा येथील नाला खोलीकरण, मेडशी येथील कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा बांधकाम कामांनाही जिल्हाधिकार्यांनी भेट दिली. करंजी व किन्हीराजा येथील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. कृषी विभागाच्यावतीने वरदरी येथील नाला खोलीकरण व कळंबेश्वर येथे करण्यात आलेले ढाळीचे बांध व शेततळ्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर ढाळीच्या बांधाच्या बाजूला चर खोदण्याच्या सूचना द्विवेदी यांनी केल्या.