शाैचालयांची कामे पूर्ण करा, अन्यथा कारवाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:27 AM2021-06-22T04:27:22+5:302021-06-22T04:27:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत पंचायत समिती स्तरावर २०१९-२० मध्ये सार्वजनिक शाैचालये पूर्ण करण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत पंचायत समिती स्तरावर २०१९-२० मध्ये सार्वजनिक शाैचालये पूर्ण करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला. मात्र, निर्धारित कालावधीत नऊ ग्रामपंचायतींनी कामे पूर्ण केली नाहीत. त्यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या दालनात सुनावणी झाली. येत्या नऊ दिवसांत कामे पूर्ण करून २८ जून रोजी अहवाल सादर करावा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा, असा सज्जड इशारा पंत यांनी यावेळी दिला.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक शाैचालये बांधण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी वितरित करण्यात आला होता. असे असताना एकांबा (मालेगाव), गोलवाडी (मंगरूळपीर), एकलासपूर, सवड, येवता (रिसोड) आणि अजनी, विठोली, दापुरा खु., दापुरा बु. (मानोरा) या नऊ ग्रामपंचायतींनी निर्धारित कालावधीत कामे पूर्ण केली नाहीत. त्यामागील कारणे काय, याबाबत जाणून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या दालनात संबंधित ग्रामपंचायतींच्या सचिवांची सुनावणी घेण्यात आली. चर्चेअंती आणखी नऊ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली. २८ जून रोजी सार्वजनिक शाैचालयांचे काम पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी पंत यांनी दिला.