प्रलंबित प्रकल्पांसह पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या देखभालीचा प्रश्न लागणार निकाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:53 PM2017-11-29T18:53:13+5:302017-11-29T18:58:15+5:30
जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकल्प, तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांची भविष्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकल्प, तसेच पूर्ण झालेल्या प्रकल्पांची भविष्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीष महाज यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या ९ डिसेंबर रोजी केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे सचिवांमार्फत प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातून १० ते १२ नद्यांचा उगम होत असल्याने मोठया व मध्यम सिंचन प्रकल्पांसाठी योग्य स्थळे उपलब्ध नाहीत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे जनहित याचिका वनजमिन मान्यता तसेच सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावीरखडली आहेत. याची दखल घेत आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे जिल्ह्याचा प्रकल्प निहाय आढावा घेण्याची विनंती केली. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या कक्षात २८ नोव्हेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आय. एस. चहल, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबादचे कार्यकारी संचालक ढंगारे, जलविज्ञान प्रकल्प नाशिकचे मुख्य अभियंता दि. रा. जोशी,अमरावतीचे मुख्य अभियंता संजय घाणेकर व वाशिम जिल्ह्यातील संबंधित अधिकारी आणि जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.