मूळ मालक जर्मनीत, दुचाकी विकली राजस्थानात; पंजाबातही चौकशी, पण मृतकाची ओळख पटेना!

By संतोष वानखडे | Published: June 26, 2023 02:53 PM2023-06-26T14:53:28+5:302023-06-26T14:53:55+5:30

दुचाकी अपघातप्रकरणी गुंतागूंत वाढली : ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान.

complexity increased in two wheeler accident case in washim identification challenge for police | मूळ मालक जर्मनीत, दुचाकी विकली राजस्थानात; पंजाबातही चौकशी, पण मृतकाची ओळख पटेना!

मूळ मालक जर्मनीत, दुचाकी विकली राजस्थानात; पंजाबातही चौकशी, पण मृतकाची ओळख पटेना!

googlenewsNext

संतोष वानखडे, वाशिम : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एमएच १४ डीबी ३१११ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २३ जूनला रात्री ८ वाजताच्या सुमारास वाशिम-मालेगाव मार्गावर घडली. मृतकाची ओळख पटविण्यासाठी वाशिम ग्रामीण पोलिसांनी अधिक तपास केला असता, नावाने ‘आरसी’ असलेला मूळ वाहन मालक जर्मनीत असून, राजस्थान, सिंदखेडराजा, पंजाब असा वाहन विक्रीचा प्रवास झाला. सर्व ठिकाणी चौकशी करूनही मृतकाची ओळख पटली नसल्याने या मृतकाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले.

एमएच १४ डीबी ३१११ क्रमांकाच्या दुचाकीने ४० वर्षीय इसम हा एकटाच वाशिमवरून मालेगावकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळी पडून होता. घटनेची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद इंगळे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मृतकाची ओळख पटली नसल्याने वाहनाच्या आरसी (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) वरून मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नावाने आरसी असलेला मूळ वाहन मालक हा जर्मनीत असल्याचे तपासातून समोर आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याच्या मित्राने ऑनलाईनद्वारे राजस्थानातील शिखर येथील एका इसमाला ही दुचाकी विकल्याचे सांगितले. या इसमाकडे चौकशी केल्यानंतर त्याने सिंदखेडराजा येथे दुचाकी विकल्याचे सांगितले. सिंदखेडराजा येथे चौकशी केली असता, त्याने पंजाबमधील एका इसमाला ही दुचाकी विकल्याचे सांगितले. यावरून वाशिम ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांशी संपर्क साधून अधिक चौकशी केली असता, सिंदखेडराजा येथून दुचाकी विकत घेतल्याचे त्याने कबूल केले; परंतू या दुचाकीचा क्रमांक वेगळा असल्याचेही स्पष्ट केले. दुचाकीच्या कागदपत्रावरून मृतकाची ओळख पटली नसल्याने तीन दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवगृहात मृतदेह आहे. सर्वत्र चौकशी करूनही मृतदेहाची ओळख पटत नसल्याने, या प्रकरणातील गुंतागूंत वाढत आहे.

Web Title: complexity increased in two wheeler accident case in washim identification challenge for police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.