बांधावर जाऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना पुरविले जातेय संगणकाचे ज्ञान!
By admin | Published: May 20, 2017 01:39 AM2017-05-20T01:39:11+5:302017-05-20T01:39:11+5:30
राजरत्न संस्थेचा उपक्रम : सैराट गाण्यापासून ते तंत्रज्ञान रुचीकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठे आंबे पाडण्यासाठी, बकऱ्या व इतर जनावरे जाण्याकरिता, तर कुठे शेतातील कामे करण्याकरिता फिरत आहेत व पालकसुद्धा सुट्याच्या नावावर त्यांच्याकडून कामे करून घेत आहेत; परंतु याच सुट्याचा शहरी भागातील विद्यार्थी विविध शिबिरातून सदुपयोग करीत असतात. हाच उद्देश समोर ठेवून राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने मालेगाव तालुक्यातील राजाकिन्ही व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपद्वारे संगणकाची माहिती देऊन उपस्थित पालकांना संगणकाचे महत्त्व पटवून देण्याकरिता बांधावर जाऊन संगणक प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
सर्वच बाबतीत ग्रामीण व शहरी भागातील दुही वाढत असून, यामध्ये तंत्रज्ञान व शैक्षणिक माहितीचा अभाव प्रामुख्याने समोर येतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी भर उन्हात दिवसभर कुठेतरी आपला वेळ वाया घालवतात. वेळेचा सदुपयोग व्हावा, याकरिता संस्थेचे प्रतिनिधी शेतशिवार बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यासह उपस्थित पालकांना संगणकाचे महत्त्व पटवून देत आहेत. विद्यार्थ्यांना शेतशिवारावर संगणक दिसल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होत असून, आपसुकच काका सैराट पिक्चरचे गाणे दिसते का, अॅनिमेशन पदवीमध्ये कॅरिअर घडविण्याच्या वाटा प्रतिनिधी सांंगत आहेत.
संगणकावर इंटरनेटच्या सहाय्याने कुठलीही माहिती, करावयाचे कार्य व वेळेची बचत याबाबत विस्तृत माहिती संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, प्रशांत राठोड, विकास पट्टेबहादूर, अविनाश नाईक, सुमेध तायडे देत आहेत. अभिनेता अरविंद उचित नकलांच्या माध्यमातून वेळेची बचत करा, संगणकाची कास धराचा संदेश देत आहेत.