संगणक परिचालकांचे थकीत मानधन मिळणार दिवाळीपुर्वी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:57 IST2019-10-15T13:57:30+5:302019-10-15T13:57:37+5:30
८५ कोटींची जमा असलेली रक्कम आरजीएसएने अग्रीम स्वरूपात ‘सीएससी-एसपीव्ही’ला अदा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

संगणक परिचालकांचे थकीत मानधन मिळणार दिवाळीपुर्वी!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यभरातील आपले सरकार सेवा केंद्रांवर कार्यरत संगणक परिचालकांचे काही महिन्यांचे मानधन थकीत आहे. ते दिवाळीपुर्वी अदा करण्यात यावे, अशा सूचना महाराष्ट्र शासनाने कार्यासन अधिकारी यांनी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या (आरजीएसए) प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत. त्यासाठी आवश्यक ८५ कोटींची जमा असलेली रक्कम आरजीएसएने अग्रीम स्वरूपात ‘सीएससी-एसपीव्ही’ला अदा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
यासंदर्भातील पत्रात नमूद करण्यात आले आहे, की शासन निर्णयातील तरतूदी तसेच सीएससी-एसपीव्ही यांच्यासमवेत झालेल्या करारानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून आवश्यक तो मोबदला अदा करणे बंधनकारक आहे; मात्र काही ग्रामपंचायतींनी पुरविण्यात आलेल्या सेवांची देयके पारित होऊनही मोबदल्याची रक्कम अद्याप जिल्हा परिषदांकडे जमा केली नाही. यामुळे ‘सीएससी-एसपीव्ही’अंतर्गत कार्यरत आपले सरकार सेवा केंद्रांवरील संगणक परिचालकांना त्यांच्या कामाचा मोबदला अदा करता आला नाही. दरम्यान, ३० आॅगस्ट २०१९ च्या अधिसुचनेनुसार ग्रामपंचायतींकडून रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून नोटीस दिल्या जात आहेत. परंतु या प्रक्रियेस दीड ते दोन महिन्याचा अवधी लागणार असल्याने तसेच दिवाळीचा सण तोंडावर असल्याने आरजीएसएने त्यांच्याकडे जमा असलेली ८५ कोटी ७९ लाखांची रक्कम अग्रीम स्वरूपात ‘सीएससी-एसपीव्ही’ यांना अदा करावी. त्यातून आपले सरकार सेवा केंद्र चालकांचा थकीत मोबदला अदा करण्यात यावा, अशा सूचना कार्यासन अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.