‘शेतकरी बाजार’ची संकल्पना हवेतच विरली!

By admin | Published: July 3, 2017 02:32 AM2017-07-03T02:32:48+5:302017-07-03T02:32:48+5:30

वर्षभरापूर्वी झाला होता निर्णय : जिल्ह्यातील नगरपालिकांची उदासीनता

The concept of 'farmers' market is rare! | ‘शेतकरी बाजार’ची संकल्पना हवेतच विरली!

‘शेतकरी बाजार’ची संकल्पना हवेतच विरली!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतांमध्ये उत्पादित भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना दर शनिवारी अथवा रविवारी सुसज्ज मैदान उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश शासनाने आॅगस्ट २०१६ मध्ये दिले. मात्र, जिल्ह्यातील नगर परिषदांनी बाळगलेल्या उदासीनतेमुळे ही उपलब्धी अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागत आहे.
शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमय) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना आपला कृषी माल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या प्रक्रियेमुळे मूल्य साखळीतील मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना परंपरागत बाजार पद्धतीत मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त होईल. याशिवाय हंगामभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांची व थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आर्थिक लूट थांबली जाऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. तसेच ग्राहकाने शेतमालासाठी अदा केलेल्या प्रत्येक रुपयातील जास्तीत जास्त वाटा शेतकऱ्यांना मिळावा, हा त्यामागचा मूळ उद्देश आहे.
त्यानुसार, शासनाच्या नगर विकास विभागाने आॅगस्ट २०१६ मध्ये सर्व नगरपालिकांना आपल्या कार्यक्षेत्रात आठवड्यातील शनिवार अथवा रविवारी सुसज्ज मैदान उपलब्ध करून केवळ ‘शेतकरी बाजार’ भरविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यास ११ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही नगरपालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही.

चिखल अन् घाणीत भरतो आठवडी बाजार!
वाशिम जिल्ह्यात केवळ वाशिम आणि कारंजा येथेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, हा अपवाद वगळल्यास मंगरूळपीर, रिसोड नगर परिषद व मानोरा, मालेगाव नगर पंचायत क्षेत्रात अद्याप शेतकऱ्यांना अशी कुठलीच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे, वाशिम, मालेगाव, मंगरूळपीर आणि रिसोड येथील जुन्या आठवडी बाजार परिसरात पावसाळ्यात चिखल आणि घाण साचते. मात्र, पर्याय नसल्याने शेतकऱ्यांसह भाजीपाला विक्रेत्यांना या समस्येचा सामना करीत व्यवसाय करावा लागत आहे.

Web Title: The concept of 'farmers' market is rare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.