चालत्या- फिरत्या ब्लड बँकेचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:36 PM2020-01-01T12:36:01+5:302020-01-01T12:36:05+5:30
नवीन वर्षानिमित्त ‘चालती फिरती ब्लड बँकेची निर्मिती केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : नववर्षाला प्रारंभ होण्यापूर्वी अनेकांनी नवनवे संकल्प केले आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला असाच एक संकल्प शहरातील विघ्नहर्ता फाउंडेशनने केला असून, नवीन वर्षानिमित्त ‘चालती फिरती ब्लड बँकेची निर्मिती केली जाणार आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. रक्ताचा पुरवठा हा रुग्णांना आवश्यक असणाऱ्या गरजेपेक्षा कितीतरी कमी आहे. अपुरा रक्त पुरवठा यामुळे अनेक जणांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मालेगाव शहरांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात ब्लड नेटवर्क तयार करण्यात येत आहे. १ जानेवारी रोजी मालेगाव शहरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे . त्यामुळे कोणालाही रक्ताची गरज पडल्यास ताबडतोब रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे विघ्नहर्ता फाउंडेशनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
रक्तदान करून त्याची सर्व माहिती ठेवून वेळेवर रक्तदाते पुरवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. रक्तदात्याची यादी तयार करून रक्तगटनिहाय यादी करून ती अद्यावत ठेवणे तसेच गरजूंना ताबडतोब रक्तपुरवठा करणे ही व्यवस्था यामार्फत मालेगाव शहरासह तालुक्यात केली जाणार आहे. रक्तपुरवठ्यासंदर्भातची माहिती अद्ययावत असली तर गरजू रुग्णांना ताबडतोब रक्तदान करणे, रक्तपुरवठा करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे ब्लड बँक नेटवर्क उभारण्यात येत असल्याने विघ्नहर्ता फाऊंडेशनने स्पष्ट केले आहे. या उपक्रमाला मालेगाव शहरासह तालुक्यातील सर्व तरुण, नागरिकांनी सहकार्य करावे तसेच आपले नाव आणि रक्तगट नोंदणी करून गरजूंना मदत करण्याचे आवाहन विघ्नहर्ता फाऊंडेशनने केले आहे. पुरेशा प्रमाणात रक्ताचा साठा होण्यासाठी नियमित रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्पही या फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त गट नोंदणी करण्यात येणार आहे. १ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर घेऊन या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे.