व्याख्यानमालेतून वैचारिक प्रबोधन - डॉ. सुभाष जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 03:08 PM2020-02-16T15:08:32+5:302020-02-16T15:08:56+5:30
हरिभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राजस्थान महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्याशी साधलेला संवाद...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरात २० वर्षांपासून हरी व्याख्यानमाला सुरू आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ९ व १० फेब्रुवारीला व्याख्यानमाला झाली. याअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, व्याख्यानमालेचा उद्देश आदिंबाबत हरिभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राजस्थान महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्याशी साधलेला संवाद...
व्याख्यानमालेला सुरुवात कशी झाली?
प्रतिष्ठानचे आश्रयदाता तथा समाजसेवी प्रा. हरिभाऊ क्षीरसागर सन २००० मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळालेल्या भविष्य निर्वाह निधीतून काही रक्कम त्यांनी आम्हाला दिली. बँकेतील ठेवीच्या व्याजातून आम्ही ही व्याख्यानमाला चालविली जाते. त्यास २० वर्षे पूर्ण झाली असून श्रोत्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत कोणकोणते वक्ते व्याख्यानमालेत येऊन गेले आहेत?
सन २००० मध्ये प्राचार्य राम शेवाळकर यांनी या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफले. तेव्हापासून आतापर्यंत डॉ. मधुकर वाकोडे, मारुती चितमपल्ली, सुरेश द्वादशीवार, मधुकर भावे, महेश मात्रे, श्रीपाद अपराजित, रा. रं. बोराडे, आसाराम लोमटे, फ. मुं. शिंदे, इंद्रजीत भालेराव, सदानंद देशमुख, विवेक घळसासी आदी दिग्गज मंडळी येऊन गेली आहे. यावर्षी डॉ. प्रदीप आगलावे आणि दिशा पिंकी शेख यांची व्याख्याने झाली.
यासाठी सहकार्य कुणाचे मिळते?
ही व्याख्यानमाला सामाजिक प्रबोधनासाठी सुरू केल्याने सर्वांकडूनच सहकार्य मिळते. पुर्वीचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनोद भोंडे यांनी प्रतिष्ठानला प्रगतिपथावर आणले. आता अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आली. प्रतिष्ठानचे आश्रयदाता प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, प्रा डॉ दादाराव देशमुख, प्रा. गजानन वाघ, प्रज्ञा देशमाने, डॉ. विजय काळे ही मंडळी व्याख्यानमालेसाठी झटते.