कोरोना लस घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:17 PM2021-01-23T12:17:24+5:302021-01-23T12:17:38+5:30

Corona Vaccine News अनेक कर्मचाऱ्यांमध्ये घबराहट असल्याने गेल्या ७ दिवसांत केवळ ९०० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.

Concerns among health workers about taking the corona vaccine | कोरोना लस घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

कोरोना लस घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी शनिवार, १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत ५ हजार ५५० ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ यांना लस दिली जात आहे; मात्र लस घेण्याबाबत अनेक कर्मचाऱ्यांमध्ये घबराहट असल्याने गेल्या ७ दिवसांत केवळ ९०० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे; तर ४ हजार ६५० कर्मचारी अद्याप बाकी आहेत. दरम्यान, लस सुरक्षित असल्याबाबत आरोग्य विभागाकडून युद्धस्तरावर जनजागृती करण्यात येत असून उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 
कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोणताही सक्षम पर्याय नसल्याने देशात जवळपास दीड कोटी लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. वाशिम जिल्ह्यातही सुमारे ७ हजार नागरिक या विषाणूने बाधित झाले असून १५२ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विषाणूच्या संसर्गाचा वेग काहीसा मंदावला असला तरी धोका पूर्णत: टळलेला नाही. त्यामुळे संसर्गापासून बचाव करणारी लस देण्याची मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना कोरोना बाधितांवर उपचार करताना विषाणू संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर आणि कारंजा येथील केंद्रांवर ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ यांना ही लस दिली जात आहे. याअंतर्गत शासकीय आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील एकूण ५ हजार ५५० कर्मचाऱ्यांची जिल्हा आरोग्य विभागाने नोंद केली होती. त्यातील केवळ ९०० जणांनीच आतापर्यंत ही लस घेतली असून तब्बल ४ हजार ६५० कर्मचाऱ्यांनी लस घेण्याबाबत तयारी दर्शविलेली नाही. दरम्यान, लस सुरक्षित असून घाबरण्याचे कुठलेच कारण नसल्याचे सांगत जिल्हा आरोग्य विभागाकडून यासंबंधील युद्धस्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी न भिता लस घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.


रिॲक्शन काय?
कोरोनाची लस घेतल्याच्या काही तासानंतर अंगाला ताप येऊन अंगदुखी जाणवते. यामुळे थकवा येतो. असे असले तरी ही रिॲक्शन फार काळ राहत नाही. काही वेळेनंतर व्यक्ती पुर्वीप्रमाणेच वावरायला लागतो, असे अनुभव अनेक कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले.

 

कोरोना लसीविषयी सध्या सोशल मीडियातून काही नकारात्मक संदेश प्रसारित केले जात आहेत. असे संदेश अर्धवट माहितीच्या आधारे पाठवले जातात. कोरोनाची लस पूर्णत: सुरक्षित आहे, त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट जाणवला नाही. 
- डॉ. अविश दरेकार 
आयुष अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, कारंजा

लसीकरणानंतर १५ ते १६ तासांनंतर अंगात काहीसा ताप जाणवला. लस टोचून घेतल्यानंतर अशी काही सौम्य लक्षणे दिसू शकतील, याची मला जाणीव होती. काही तासांनंतर ताप कमी झाला. त्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही.  
- विद्या किसनराव भुसारे 
परिचारिका, उपजिल्हा रुग्णालय, कारंजा


कोरोनाची लस सर्वच बाबतीत सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर तत्काळ काहीच त्रास जाणवला नाही. १२ तासानंतर मात्र थोडासा ताप, अंगदुखी जाणवली. मात्र, ही काही गंभीर बाब नाही. लस शरीरात गेल्यानंतर तिचे ‘इम्यूनाइजेशन’ होताना अशी लक्षणे दिसणे साहजिक आहे. आता ताप, अंगदुखी कमी झाली असून इतर कोणताही गंभीर त्रास जाणवला नाही. 
- आरती अतुल ताठे
आैषध निर्माण अधिकारी, पोहा


वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस तसेच इतर स्टाफने सोशल मीडियातून पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. त्यापेक्षा प्रत्यक्ष लस घेतलेले वरिष्ठ डॉक्टर, सहकाऱ्यांशी चर्चा करून संभ्रम दूर करावा. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लस टोचून घेणे आवश्यक आहे. मीसुद्धा लस घेतली असून कुठलाही त्रास जाणवलेला नाही. 
- डॉ. अविनाश आहेर 
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
 

Web Title: Concerns among health workers about taking the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.