खरीप, भाजीपाला पिकांवर शंखी गोगलगायीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:24+5:302021-07-25T04:34:24+5:30
मानोरा तालुक्यात देवठाणा येथे नाला व आजूबाजूच्या परिसरात सोयाबीन, कपाशी संत्रा भाजीपाला पिकाची रोपे आदी पिकांवर शंखी ...
मानोरा तालुक्यात देवठाणा येथे नाला व आजूबाजूच्या परिसरात सोयाबीन, कपाशी संत्रा भाजीपाला पिकाची रोपे आदी पिकांवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याच्या अनुषंगाने २२ जुलै रोजी उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, तालुका कृषी अधिकारी के. डी. सोनटक्के यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांचा तज्ज्ञ मार्गदर्शक या नात्याने समावेश असलेल्या समितीने देवठाणा येथे भेट देऊन महाराष्ट्र शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबाराव जामदार यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशी संत्रा भाजीपाला पिके यांच्या प्रक्षेत्राला भेट देऊन पी. पाहणी करण्यात आली. या पी.पाहणी दरम्यान भेट दिलेल्या समितीला शंखी गोगलगाय सोयाबीन, संत्रा, भाजीपाला आदी पिकांची रात्रीच्या वेळेस पाने किंवा रोपाच्या बियाचे अंकूर खाऊन नुकसान करीत असल्याचे आढळून आले. विशेषत: गावालगत नाल्याच्या काठी असलेल्या शिवारातील पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव आढळून आला. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी घोडेकर, कृषी पर्यवेक्षक जैताडे, आर. व्ही. सवने, कृषी सहायक डी. एस. खुडे, गजानन इडोळे, व्ही. पी. रणबावळे यांनी गाव-शिवाराच्या नालाकाठच्या परिसराची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
----------
शेतकरी चर्चासत्रातून व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
प्रक्षेत्र भेटीनंतर शंखी गोगलगायीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत चर्चासत्र घेण्यात आले. यात कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी शंखी गोगलगायची ओळख, अचानक शंखी गोगलगायीचा होणाऱ्या प्रादुर्भावाची कारणमिमांसा, नुकसानाचा प्रकार, तसेच सामूहिकरीत्या शंखी गोगलगायीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले, तसेच शेतकऱ्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन केले. यावेळी, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबाराव जामदार, प्रगतिशील शेतकरी सुनील जामदार, अनिल जामदार, उमेश जामदार, चंद्रकांत खराडे, पवन पवार आदी शेतकरी उपस्थित होते.
---------------
उपाय योजनांबाबत विस्तृत माहिती
सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील व बांधावरील गोगलगाय व त्यांची अंडी हाताने गोळा करून मिठाचे द्रावणात टाकून त्यांचा नाश करणे, घरचे खराब पोते किंवा बोंद्रे गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून रात्री शेताच्या बांधावर पाऊस नसताना ठेवणे, रात्री शेताच्या बांधावर सात ते आठ मीटर अंतरावर वाळलेल्या अर्धवट कुजलेल्या गवताचे किंवा टाकाऊ पदार्थांच्या अवशेषाचे ढीग ठेवून या ढिगावर गुळाच्या पाण्याचा शिडकावा देऊन सकाळी या कचऱ्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी मिठाच्या द्रावणात टाकून नष्ट करणे आदी उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
240721\24wsm_1_24072021_35.jpg
खरीप, भाजीपाला पिकांवर शंखी गोगलगायीचा हल्ला