सहमती पत्र, ‘आधार’नंतरच निराधारांना अनुदान!
By admin | Published: January 20, 2017 02:17 AM2017-01-20T02:17:12+5:302017-01-20T02:17:12+5:30
वाशिम जिल्ह्यातील सर्वच बँकांना निर्देश; अग्रणी बँकेला जिल्हाधिका-यांचे पत्र.
वाशिम, दि. १९- शासनाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी आधार क्रमांक आवश्यक केल्यानंतर लाभार्थींना अनुदानाचे वितरण करताना बँकांकडे लाभार्थीच्या आधारकार्डची प्रत व सहमती पत्र सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. यासंदर्भात वाशिम जिल्हाधिकार्यांकडून लीड बँकेच्या शाखाधिकार्यांना पत्र पाठवून आधार कार्डची सत्यप्रत आणि सहमती पत्र सादर केल्याशिवाय लाभार्थींना अनुदान वितरीत न करण्याचे निर्देश देण्याची सूचना १७ जानेवारी रोजी दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
शासनाने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य नवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन योजनेच्या लाभाथीर्ंसाठी आधार क्रमांक आवश्यक केले. त्यानंतर जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्यावतीने डिसेंबर २0१६ मध्ये विशेष मोहीम राबवून विविध योजनांतून अनुदान घेणार्या लाभार्थींचे आधार क्रमांक संकलित करण्यात आले. यापूर्वी जिल्ह्यातील ९४ हजार लाभार्थींपैकी ७0 हजारांच्यावर लाभार्थींनी आपले आधार क्रमांक सादर केलेले होते, तर विशेष मोहिमेंतर्गत त्यात आणखी १६ हजार लाभार्थींच्या आधार क्रमांकाची भर पडली होती. ही मोहीम ३१ डिसेंबर २0१६ पयर्ंत राबविताना लाभार्थींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे अनुदान स्थगित ठेवण्यात आले होते. मोहीम राबविल्यानंतर आधार क्रमांकांची पडताळणी करण्यात आली आणि पात्र लाभार्थींचे अनुदान बँकांकडे पाठविण्यात आले. या अनुदानाचे वितरण लाभार्थींना करताना त्यांच्याकडून आधार कार्डची सत्यप्रत, तसेच, मोबाइल क्रमांक नमूद असलेले आणि स्वत:ची ओळख पटविणारे सहमती पत्र बँकांना घ्यावे लागणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी लीड बँक वाशिमच्या शाखाधिकार्यांना पत्र पाठविले असून, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींकडून त्यांचे सहमती पत्र आणि आधार कार्डची सत्यप्रत घेण्याच्या सूचना सर्वच संबंधित बँकांना देण्याचे निर्देश त्या पत्रातून दिले आहेत. सहमती पत्र आणि आधार कार्डची सत्यप्रत सादर केल्याशिवाय अनुदान वितरीत करू नये, असे निर्देश देण्याची सूचनाही जिल्हाधिकार्यांनी दिली आहे.