शिक्षक, शिक्षकेतरांच्या शाळांतील उपस्थितीबद्दल संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:29 AM2021-06-18T04:29:05+5:302021-06-18T04:29:05+5:30
शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणच्या शाळा शिक्षकांसाठी १५ जूनपासून सुरू करण्यात आल्या आहेत. या ...
शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणच्या शाळा शिक्षकांसाठी १५ जूनपासून सुरू करण्यात आल्या आहेत. या भागांत जि.प.ने शिक्षक, शिक्षकेतरांच्या उपस्थितीबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या सूचनांमध्ये भिन्नता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षकांत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत माहिती घेण्यात आली. त्यात अद्याप जि.प.चे या संदर्भात पत्र नसून, या पत्रानंतरच संभ्रम दूर होणार असल्याचे कळले आहे.
जिल्ह्यातील शाळा
-जि.प. शाळा - ७७३
-अनुदानित शाळा -१८४
-विनाअनुदानित शाळा - ४२२
-शिक्षक- ४३००
-शिक्षकेतर कर्मचारी १७१९
------------
शिक्षण संचालकांचे पत्र
शिक्षण संचालकांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकांच्या उपस्थितीबाबत १४ जून रोजी जारी केलेल्या पत्रानुसार इयत्ता पहिली ते ९ वी व ११ वीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती शाळांत अनिवार्य असेल, तर इयत्ता १० वी व १२ वीच्या १०० टक्के शिक्षकांची शाळांत उपस्थिती अनिवार्य असेल. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असून, प्राथमिक, माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांसह कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार आहे.
^^^^^^
जि.प.चे पत्रच जारी नाही
येत्या २८ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना आहेत. यात वाशिम जिल्ह्यातील शाळांचाही समावेश आहे. केवळ शिक्षकांसाठीच या शाळा सुरू होणार असून, शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल शिक्षण संचालकांनी १४ जूनच्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शिक्षक, शिक्षकेतरांना कल्पनाही आहे. तथापि, जि.प. शिक्षण विभागाकडून अद्यापही शिक्षक, शिक्षकेतरांच्या उपस्थितीबद्दल मार्गदर्शक सूचना जारी झाल्या नाहीत.
----
कोट: शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या पत्रानुसार ५० टक्के उपस्थितीबद्दल आमची काही हरकत नाही; परंतु याबद्दल जिल्हा स्तरावरून योग्य मार्गदर्शक
सूचना देण्यात याव्यात, जेणे करून मुख्याध्यापक व शिक्षक यांना वेळेचे व उपस्थितीचे नियोजन करता येईल.
-राजेश मोखडकर,
शिक्षक, कारंजा
--------------
कोट: येत्या २८ जूनपासून शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल शिक्षण संचालकांचे पत्र जारी झाले आहे. तथापि, जि.प. शिक्षण विभागाचे असे कोणते पत्र जारी झाले नाही. त्यांचे पत्र जारी झाल्यानंतरच उपस्थितीबाबत निश्चित सांगता येईल.
-संदीप देशमुख,
शिक्षक, वाशिम