CoronaVirus : पुणे, मुंबईहून परतलेल्या नागरिकांच्या तपासणीबाबत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:16 PM2020-03-20T18:16:15+5:302020-03-20T18:19:02+5:30
केवळ लक्षणांबाबत तोंडी माहिती घेऊन पुढील १५ दिवस घरी थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: मुंबई, पुणे या शहरांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने या महानगरात रोजगार किंवा नोकरीसाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक परत येत आहेत. या नागरिकांची माहिती पोलीस पाटलांकडून संकलित करण्यात येत आहे; परंतु गावातील किंवा नजिकच्याच आरोग्य केंद्रात तपासणी आवश्यक असताना त्यांना थेट जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला देण्यात आहे, तर जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी न करता तोंडी माहिती घेऊन परत पाठविले जात असल्याचा प्रकार शुक्र वारी उघडकीस आला.
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असतानाच मुंबई, पुणे यासारख्या शहरांतही या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे सारख्या शहरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील नोकरदार, कामगार परत येत आहेत. या लोकांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस पाटलांना अशा नागरिकांची संपूर्ण माहिती संकलित करून ती तालुका दंडाधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिले, तसेच या नागरिकांनी स्वत: नजिकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी किंवा आरोग्य विभागाने त्यांची तेथेच तपासणी करून त्यांना पुढील १५ दिवस घरातच थांबण्याचा सल्ला द्यावा, अशा सुचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत. तथापि, माहिती संकलित करतानाच महारानगरातून आलेल्या काही नागरिकांना थेट जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी जाण्याचा सल्ला देण्यात येत असून, जिल्हा रुग्णालयात मात्र तपासणी न करता केवळ लक्षणांबाबत तोंडी माहिती घेऊन पुढील १५ दिवस घरी थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यामुळे स्थलांतरीत नागरिकांची तारांबळ उडत आहे. असा प्रकार मुंबई येथे नोकरी करणाºया आणि परत आलेल्या रिसोड तालुक्यातील अमोल रामदास सावसुंदर या २४ वर्षीय युवकासोबत घडला. त्याची माहिती घेतल्यानंतर त्याला शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले; परंतु तेथे केवळ तोंडी माहिती घेऊन त्याला परत पाठविण्यात आले.
परजिल्ह्यातून परत येणाºया नागरिकांना नजिकच्याच आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्याच्या सुचना देण्यात येत असून, या नागरिकांवर आरोग्य विभागाचे पूर्ण लक्षही आहे. त्यामुळे या नागरिकांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येण्याची गरजच नाही. कोणती लक्षणे आढळून येत असतील, तरच अशा नागरिकांना जिल्हा रुग्णालयात बोलावून तपासणी केली जाईल.
-अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्यचिकित्सक,
वाशिम