पंचायत समित्यांवर काँग्रेस, भाजपाचा वरचष्मा!
By admin | Published: June 28, 2016 02:43 AM2016-06-28T02:43:27+5:302016-06-28T02:43:27+5:30
सभापती-उपसभापती निवड; तीन उपसभापती पदे राष्ट्रवादीकडे; तर उर्वरित तीन ठिकाणी सेना, भाजपा, भारिपची सरशी.
वाशिम : जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांमध्ये सोमवार, २७ जून रोजी पार पडलेल्या सभापतिपदाच्या निवडणुकीत तीन ठिकाणी काँग्रेस; तर उर्वरित तीन ठिकाणी भाजपाचा वरचष्मा राहिला. तसेच उपसभापती पदाच्या निवडीमध्ये एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसने तीन पंचायत समित्यांमध्ये यश मिळविले असून, इतर तीन पंचायत समित्यांमध्ये शिवसेना, भाजपा आणि भारिपला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहाही पंचायत समित्यांमधील सभापती-उपसभापती पदांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ २८ जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यानुषंगाने सोमवार, २७ जून रोजी सर्वच पंचायत समित्यांच्या नूतन सभापती-उपसभापतींची निवड करण्यात आली. यात वाशिम पंचायत समितीमध्ये गजानन भोने (काँग्रेस) आणि मधुबाला चौधरी (राष्ट्रवादी काँग्रेस) यांची बिनविरोध निवड झाली. मालेगाव पंचायत समितीमध्ये सभापती पदी मंगला गवई (भाजपा) यांची; तर ज्ञानबा सावळे (शिवसेना) यांची उपसभापतीपदी निवड झाली. कारंजा पंचायत समितीत सभापती वर्षा नेमाने (काँग्रेस), उपसभापती मधुकर हिरडे (राष्ट्रवादी काँग्रेस), रिसोड पंचायत समितीत सभापती प्रशांत खराटे (भाजपा), उपसभापती विनोद नरवाडे (भाजपा), मंगरूळपीरमध्ये सभापती नीलिमा देशमुख (भाजपा), उपसभापती सागर खोडके (भारिप) आणि मानोरा पंचायत समितीमध्ये सभापतीपदी धनश्री राठोड (काँग्रेस) यांची; तर रजनी गावंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांची उपसभापती म्हणून वर्णी लागली. तथापी, आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भाजपाने जणू कात टाकल्याचे दिसून येत आहे. त्याचाच सकारात्मक परिणाम झाला असून, जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये भाजपाचे एकाच्या ठिकाणी तीन सभापती झाले आहेत.