अजेंडा नसलेली काँग्रेस सैरभैर झाली!; जावडेकरांची विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 05:35 PM2018-09-22T17:35:20+5:302018-09-22T17:36:07+5:30

केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभरातील जनतेसाठी विविध स्वरूपातील महत्वाकांक्षी योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Congress does not have agenda; Commentary on Javadekar's opponents | अजेंडा नसलेली काँग्रेस सैरभैर झाली!; जावडेकरांची विरोधकांवर टीका

अजेंडा नसलेली काँग्रेस सैरभैर झाली!; जावडेकरांची विरोधकांवर टीका

Next

वाशिम : केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभरातील जनतेसाठी विविध स्वरूपातील महत्वाकांक्षी योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. काँग्रेसकडे मात्र ठोस असे करण्यासारखे काहीच उरले नाही, कुठलाही महत्वपूर्ण अजेंडा नाही. त्यामुळे सैरभैर झालेली काँग्रेस विद्यमान भाजपा सरकारवर निरर्थक व बिनबुडाचे आरोप करीत सुटली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे शनिवार, २२ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.
जिल्ह्यातील पाच ठिकाणी उभारण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे (हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर) ना. जावडेकर यांच्याहस्ते आज उद्घाटन झाले. यादरम्यान दुपारी ३ वाजता वाशिममध्ये माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांना संबोधित केले. पुढे बोलताना जावडेकर म्हणाले, की भाजपा सरकारने सर्वच पातळ्यांवर सर्वंकष विकास साधण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरातील ११५ मागास जिल्ह्यांचा ‘अ‍ॅस्पिरेशनल डिस्ट्रीक्ट’ उपक्रमात समावेश करून संबंधित जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. याशिवाय २३ सप्टेंबर रोजी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रांची (झारखंड) येथून देशभरातील ६०० पेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या आरोग्यविषयक योजनेची घोषणा करणार आहेत. याअंतर्गत १० कोटी ७० लाख कुटूंबांना दरवर्षी आरोग्यविषयक खर्चासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मदतीची तरतूद करण्यात आलेली आहे. 
एकूणच विद्यमान सरकार देशातील प्रत्येक नागरिकाचा फायदा डोळ्यासमोर ठेवून कार्य करित असताना काँग्रेस मात्र बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानत आहे. कधी पेट्रोल; तर कधी केरोसीन, राफेल घोटाळा झाल्याचे भासवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यात कुठलेही तथ्य नसून आगामी २०१९ मध्येही जनता भाजपालाच स्पष्ट कौल देईन, असा विश्वास मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव, पुरूषोत्तम राजगुरू आदिंची उपस्थिती होती.

Web Title: Congress does not have agenda; Commentary on Javadekar's opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.