मालाचा दर्जा चांगला नसल्याचे घेतले जाते संमती पत्र!
By admin | Published: March 21, 2017 03:03 AM2017-03-21T03:03:58+5:302017-03-21T03:03:58+5:30
वाशिममधील प्रकार : मोजणीला विलंब, माल पाहण्यापूर्वीच दर्जाची निश्चिती
वाशिम, दि. २0-शासनाने तुरीला ५ हजार ५0 रुपयांचा हमीभाव जाहीर केला. नाफेडची खरेदी सुरू केली; परंतु या दोन्ही बाबींचा शेतकर्यांना काहीच फायदा होत नसल्याचे चित्र वाशिम बाजार समितीत दिसत आहे. नाफेडच्या केंद्रावर शेतकर्यांना टोकन देऊन तब्बल दीड महिना माल मोजणीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे कंटाळल्यानंतर बाजारात माल विकणार्या शेतकर्यांकडून त्यांचा शेतमाल एफएक्यू अर्थात उच्च गुणवत्तेचा नसल्याचे प्रमाणपत्रच बाजार समितीकडून घेण्याचाही प्रताप करण्यात येत असल्याचे ह्यलोकमतह्णकडून २0 मार्च रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाला.
यंदा शासनाने सोयाबीनला २ हजार ८00 रुपये, तर तुरीला ५ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर केला; परंतु या दोन्ही मालास हमीभाव देण्याला व्यापार्यांनी खो दिला आहे. मालाची प्रतवारीही चांगली आहे; परंतु शेतकर्याच्या मालाचे भाव पाडण्याचे कुटील षड्यंत्र बाजार व्यवस्थेकडून राबविले जात आहे. शासनाने नाफेडची खरेदी सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच वखार महामंडळाची गोदामे भरल्याने नाफेडने खरेदी संथ केली. जिल्ह्यात पाच तालुक्यांत होत असलेली नाफेडची खरेदी काही ठिकाणी महिनाभरातच साठवणुकीच्या अडचणीपोटी बंद करण्यात आली. शेतकरी आक्र मक झाल्यानंतर नाफेडने खरेदी सुरू केली; परंतु आता या ठिकाणी शेतकर्यांचा माल मोजण्यास तब्बल सव्वा महिन्याचा कालावधी लागत आहे. वाशिम येथे दोन वजन काटे सुरू असतानाही दिवसाला शंभर, दीडशे क्विंटल तुरीची मोजणी होत आहे.
महिनाभर थांबण्याची शक्तीच शेतकर्यांत नसल्याने शेतकरी बाजारात व्यापार्यांकडे माल विकण्यावर भर देत आहेत; परंतु या ठिकाणी हमीभावाची अडचण नको म्हणून बाजार समिती चक्क प्रत्येक शेतकर्याकडून त्याचा माल एफएक्यू (सरासरी चांगल्या दर्जाचा) नसल्याच्या संमती पत्रावर स्वाक्षरी घेत आहे.
शेतकर्यांकडून छुपी अडत वसुली
नाफेड आणि व्यापारी शेतकर्यांची लुबाडणूक करीत असतानाच अडत्याकडूनही शेतकर्यांना लुबाडण्याचा प्रकार वाशिम येथे सुरू असल्याचे सोमवारी उघडकीस आले. शेतकर्यांकडून अडत वसुली बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतरही काही शेतकर्यांकडून एका अडत्याने अडतीचे (बटाऊ) पैसे वसूल केल्याच्या तक्रारी बाजार समितीकडेच काही शेतकर्यांनी केल्या आहेत. अडत्याकडून शेतकर्याला देण्यात येणार्या पावतीवर नियमानुसार खर्चाची दर आकारणी करून पावतीच्या मागील बाजूस एक रु पया शेकडाप्रमाणे अडतीचे पैसे कापल्याचा हिशेब करून शेतकर्यांना पैसे चुकविण्यात आले आहेत.