पिकांनी टाकल्या माना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:17 AM2017-08-15T01:17:37+5:302017-08-15T01:18:49+5:30
वाशिम: जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये खरिपाची पीक परिस्थिती अंत्यत दयनीय झाली असून, पाण्याअभावी पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. म्हणायला, रविवारी (२.१७ मि.मी.) आणि सोमवारी काही ठिकाणी पाऊस झाला; परंतु तो पुरेसा नसल्याने चांगल्या जमिनीवरील पिकांच्या सरासरी उत्पादनात ३0 टक्के, तर हलक्या जमिनींवरील पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे संकेत सूत्रांकडून वर्तविले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून, त्यापैकी यावर्षी ४.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपातील विविध पिकांची पेरणी करण्यात आली. असे असले तरी जून महिन्याच्या प्रारंभी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने त्यानंतर मात्र सतत हुलकावणी दिली. अधूनमधून पाऊस झालाही; परंतु तो सार्वत्रिक स्वरूपातील नाही. त्यामुळे १ जून २0१७ ते १३ ऑगस्ट २0१७ या कालावधीत वार्षिक सरासरीच्या ४१.८१ टक्के पर्जन्यमान होऊनही पिके धोक्यात सापडण्यासोबतच जिल्ह्यातील १२२ पैकी तब्बल ७५ सिंचन प्रकल्प अद्याप कोरडच आहेत. यामुळे नापिकीच्या संकटासह आगामी काळात पाणीटंचाईदेखील भीषण रूप धारण करण्याची शक्यता उद्भवली आहे.
सोयाबीनची फुलगळ; शेंगाही अपरिपक्व!
सध्या शेतांमधील सोयाबीन पिकाला फूल तसेच शेंगा लागल्या आहेत. अशास्थितीत पुरेशा पाण्याची नितांत गरज भासत आहे. मात्र, पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे फुलांची गळती होत असून, सोयाबीनच्या शेंगा अपरिपक्त असताना त्याही पाण्याअभावी गळून पडत आहेत. त्याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर होणार असून, आधीच अडचणीत असलेला शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकरी त्यांचाकडे उपलब्ध असलेल्या थोड्याफार पाण्याचा स्प्रिंकलेरच्या सहाय्याने वापर करून शेत भिजवत आहेत. मात्र, हे पाणीदेखील अधिक काळ पुरणार नसल्याचे चित्र आहे.