सुरकंडी, वाशिम येथील मृतकांच्या कुटूंबियांचे खासदारांकडून सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 02:11 PM2018-09-24T14:11:23+5:302018-09-24T14:12:35+5:30
वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी मृतकांच्या कुटुंबियांची २३ सप्टेंबर रोजी भेट घेऊन सांत्वन केले, तसेच जखमींचीही विचारपूस केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: हिंगोली नजिक ट्रक व कारच्या भीषण अपघातात वाशिम व सुरकंडी येथील सहा जण मृत्युमुखी पडले, तसेच दोन जण जखमी झाले. वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी मृतकांच्या कुटुंबियांची २३ सप्टेंबर रोजी भेट घेऊन सांत्वन केले, तसेच जखमींचीही विचारपूस केली. यावेळी मृतकांच्या कुटुंबियांसह जखमींना शासकीय मदत मिळवून देण्याचे आवश्यक त्यांनी दिले.
गणेश विसर्जनासाठी ढोलताशा ठरविण्यासाठी वाशिम येथील गणेश हजारे, सतीश मुरकुटे, नरसिंह हजारे व सुरकंडी येथील अनिल चव्हाण, स्वप्नील इरतकर, राजू धामणे, मदन चव्हाण व सखाराम चव्हाण हे आठ जण २० सप्टेंबर रोजी वाहनाने हिंगोलीकडे रात्री जात होते. दरम्यान, वाशिम हिंगोली मार्गावरील अन्नपूर्णा इंटरनॅशनल शाळेजवळ ट्रॅक व त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यात गणेश हजारे, नरसिंह हजारे, सतीश मुरकुटे, राजू धामणे, स्वप्नील इरतकर व अनिल चव्हाण या सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मदन चव्हाण व सखाराम जाधव हे गंभीर जखमी झाले. यातील मदन चव्हाण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेची माहिती मिळताच २३ सप्टेंबर रोजी सकाळी खासदार गवळी यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. अपघातग्रस्त अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने जखमींना उपचारासाठी, तसेच मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तसेच इतर मार्गाने जमेल तशी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, रवी भांदुगे, निलेश पेंढारकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.