"महाकुंभाच्या निमित्ताने बंजारा समाजाची 'पर्यायी काशी' असलेल्या पोहरादेवीची ओळख पुसण्याचा प्रयत्न"
By संतोष वानखडे | Published: December 4, 2022 05:43 PM2022-12-04T17:43:30+5:302022-12-04T17:45:43+5:30
पोहरादेवीतील पत्रकार परिषदेत बंजारा नेत्यांचा आरोप
वाशिम (संतोष वानखडे): भाजपा व संघ परिवाराच्या वतीने जळगाव जिल्हयातील गोद्री येथे बंजारा समाज महाकुंभ मेळाव्याचे आयोजन केले आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीची ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरू असून, राजकीय स्वार्थासाठी समाजाची ओळख नष्ट करण्याचे प्रयत्न आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा बंजारा नेते तथा काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, महंत सुनील महाराज यांच्यासह बंजारा नेत्यांनी रविवार, ४ डिसेंबर रोजी दिला. पोहरादेवी (ता.मानोरा) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आमदार राजेश राठोड, बलदेव महाराज, मधुकर जाधव, पंजाबराव चव्हाण, अमोल पाटील तरोडकर, गोविंदराव चव्हाण, प्रकाश राठोड, इप्तेखार पटेल आदींची उपस्थिती होती. देवानंद पवार पुढे म्हणाले की, देशभर बंजारा समाजाची भाषा, वेशभूषा तसेच चालीरीती एकच आहे. निसर्गपूजक आणि मातृपूजक अशी ओळख असलेल्या बंजारा समाजाची ‘हिंदु सनातन गोर बंजारा’ अशी नवी ओळख निर्माण करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही केला. ज्या ठिकाणाला कोणतीही धार्मिक पार्श्वभूमी नाही, अशा ठिकाणी महाकुंभ मेळावा घेतला जात आहे. हे संत सेवालाल महाराजांच्या पोहरादेवीचे महत्त्व कमी करण्याचे विचार आहे. राजकीय स्वार्थासाठी पोहरादेवीची ओळख नष्ट करण्याचे पाप भाजपाने करु नये, असा टोलाही पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी लगावला. राजकारण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र धर्म हा राजकारणाचा आधार असू शकत नाही असे स्पष्ट करीत भाजपाच्या या भूमिकेला तीव्र विरोध असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.