अंगणवाडीचे बांधकाम रखडले!
By admin | Published: June 3, 2017 01:54 AM2017-06-03T01:54:47+5:302017-06-03T01:54:47+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष: चिमुकल्यांना बसावे लागणार उघड्यावर !
लोकमत न्यूज नेटवर्क
पार्डी ताड : मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील अंगणवाडी क्रमांक तीनच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे.
अंगणवाडी क्रमांक तीनच्या इमारत बांधकामाला २०११ मध्ये सुरूवात झाली होती. या इमारतीच्या भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, स्लॅपचे बांधकाम अपूर्ण आहे. उर्वरीत निधी अप्राप्त असल्याने बांधकाम रखडल्याचे सांगितले जाते. पार्डी ताड येथे तीन अंगणवाडी केंद्र असून, तीन अंगणवाडी सेविका व तीन मदतनीस यांची नियुक्ती झालेली आहे. दोन अंगणवाडीचे बांधकाम झालेले असून, आता केवळ एका अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण होणे बाकी आहे. क्रमांक तीनच्या अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण असल्याने चिमुकल्यांना अंगणवाडी इमारतीबाहेर बसण्याची वेळ यापूर्वी आली होती. आता शाळा सुरू झाल्यानंतरदेखील चिमुकल्यांना शिकविण्याचा पेच आहे. जून्याच अंगणवाडी बसवून चिमुकल्यांना शिकवावे लागेल, अशी शक्यता दिसत आहे. पंचायत समितीच्या एका अभियंत्याला विचारले असता, अंगणवाडीच्या उर्वरीत बांधकामाकरिता पंचायत समितीमध्ये फेब्रुवारी २०१७ मध्ये निधी आला होता. मात्र, ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे तो निधी खर्च झाला नाही, असे विश्वसनीय सूत्राचे म्हणणे आहे. याबाबत विद्यमान ग्राम पंचायत सचिव दीपा सुर्वे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, अर्धवट राहिलेल्या अंगणवाडी बांधकामाची आपल्याला माहिती नाही. यापूर्वीच्या सचिवाने याबाबत माहिती दिली नसल्याने या विषयावर अधिक काही सांगता येणार नाही. या संदर्भात माहिती घेऊनच काही सांगता येणार आहे.
बांधकामाचा निधी अखर्चितच
पार्डी ताड येथील अंगणवाडी क्रमांक तीनच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे. यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता. त्याचा वापरच होऊ शकला नाही. यामध्ये कोणाची हेळसांड आहे, ते कळायला मार्ग नाही. निधी मंजूर झाल्यानंतर सबंधितांनी त्याचा वापर करून बांधकाम का केले नाही, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.