बांधकाम साहित्य महागले; घरकुलाचे अनुदान ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 11:36 AM2021-05-27T11:36:38+5:302021-05-27T11:36:44+5:30

Construction materials became expensive : एका वर्षात सिमेंट, विटा, रेती, लोखंड आदींच्या भावात दीड पटीने वाढ झाली.

Construction materials became expensive; Household grants are 'as is' | बांधकाम साहित्य महागले; घरकुलाचे अनुदान ‘जैसे थे’च

बांधकाम साहित्य महागले; घरकुलाचे अनुदान ‘जैसे थे’च

googlenewsNext

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे एकापाठोपाठ एक असे हादरे बसत आहेत. इंधन, खाद्यतेल, डाळी यापाठोपाठ आता सिमेंट, विटा, लोखंडाचे दरही वाढले आहेत. एका वर्षात सिमेंट, विटा, रेती, लोखंड आदींच्या भावात दीड पटीने वाढ झाली, तर घरकुलाचे अनुदान मात्र ‘जैसे थे’च असल्याने बांधकाम पूर्ण कसे करावे, असा प्रश्न सहा हजार लाभार्थींसमोर उभा ठाकला आहे.
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. २४ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने जून महिन्यापर्यंत बांधकामेही ठप्प होती. त्यानंतर अनलॉकचे टप्पे सुरू झाले आणि बांधकाम क्षेत्राला परवानगी मिळाली. लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जूनदरम्यान उत्पादक कंपन्या प्रभावित झाल्याने त्यानंतर बांधकाम साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. स्टील, सिमेंट, विटाच्या दरात वाढ झाल्याने साहजिकच घरांचे बांधकामही महागले. दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. संचारबंदी व कडक निर्बंध लागू आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बांधकाम साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते. उत्पादक कंपन्यांकडून होत असलेली ही दरवाढ घरकुल लाभार्थ्यांना जबर फटका देणारी ठरत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सिमेंटच्या एका गोणीचे भाव ३०० ते ३३० रुपयांदरम्यान होते. आता हेच दर ३९० ते ४१० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गतवर्षी ऑगस्टमध्ये लोखंडाचे दर प्रति किलो ३८ ते ४६ रुपयांदरम्यान होते.
 आता हेच दर ५६ ते ५८ रुपयांपर्यंत झेपावले आहेत. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने सिमेंट व लोखंडाचे भाव वाढल्याचे सांंगण्यात येत आहे. मजुरी, विटा, रेती, गिट्टीच्या भावातही वाढ झाली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात घरकुल बांधकामासाठी गत ६ वर्षांपासून १.२० लाख रुपयेच अनुदान आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण कसे करावे, हा आर्थिक पेच लाभार्थींसमोर निर्माण झाला आहे. सन २०२०-२१ मध्ये दोन हजार घरकुले आणि त्यापूर्वीची अपूर्ण असलेली  जवळपास चार हजार घरकुले अशा एकूण सहा हजार घरकुल लाभार्थींना या दरवाढीचा फटका बसला आहे.

 

एकिकडे बांधकाम साहित्याच्या किंमतीत दर दोन, तीन महिन्याने वाढ होत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील घरकुल योजनांचे अनुदान मात्र जैसे थे राहत आहे. महागाईमुळे १.२० लाखात घरकुल बांधकाम पूर्ण कसे करावे? हा महत्वाचा प्रश्न आहे.
- गौतम वानखडे
घरकुल लाभार्थी.


कोरोनामुळे गतवर्षी काही महिने उत्पादक कंपन्या बंद होत्या. वाहतूकही प्रभावित होती. याचा परिणाम म्हणून दरवाढ झाल्याचे तेव्हा सांगण्यात येते होते. आता परत बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. तीन महिन्यात सिमेंटच्या गोणीमागे ५० ते ६० रुपये वाढ झाली.
- वीरेंद्र बागरेचा,
बांधकाम साहित्य विक्रेता

Web Title: Construction materials became expensive; Household grants are 'as is'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम