बांधकाम कामगारांना घरपोच मिळणार स्मार्टकार्ड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:57+5:302021-07-07T04:50:57+5:30
वाशिम : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे संकट उभे आहे. खबरदारीचा प्रयत्न म्हणून, ...
वाशिम : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे संकट उभे आहे. खबरदारीचा प्रयत्न म्हणून, तसेच कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून बांधकाम कामगारांना यापुढे घरपोच स्मार्टकार्ड दिलेे जाणार आहे.
राज्यात जून २०२१ पासून ‘ब्रेक द चेन’ कालावधीतील ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज मंजूर होऊन सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्याकडून नोंदणी अर्ज मंजूर झालेले आहेत व या कार्यालयाकडून ओळखपत्र अर्थात स्मार्ट कार्ड देण्याबाबत एसएमएस प्राप्त झाले आहेत, असे बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात जिल्हा कार्यालयाकडे येत आहेत. बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नाही. ज्या बांधकाम कामगारांचे नोंदणी अर्ज यापूर्वीच मंजूर झालेले आहेत व त्या बांधकाम कामगारांनी नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळाच्या बँक खात्यात जमा केली आहे, अशा बांधकाम कामगारांचे ओळखपत्र अर्थात स्मार्टकार्ड फिल्ड एजंट, खास दूत, कुरिअर, पोस्ट ऑफिसमार्फत बांधकाम कामगांराना वितरित करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम कामगारांनी नेांदणी, नूतनीकरण व लाभाबाबत ऑनलाईन प्रक्रियेचा लाभ घ्यावा व जिल्हा कार्यालयात बांधकाम कामगारांचा जमाव होणार नाही व कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव कालावधीत केंद्र शासन, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेल्या निर्बंधांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
----------------------------
एकूण नोंदणीकृत बांधकाम कामगार १९४४५
------------------------------
नोंदणी फी भरणे आवश्यक
नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळ खाती जमा केलेली नाही अशा बांधकाम कामगारांना खासगी संस्थेकडून लघुसंदेश एसएमएसद्वारे पेमेंट लिंक पाठविण्यात आलेली आहे. या लिंकद्वारे बांधकाम कामगाराने पेमेंट गेटवेमार्फत नोंदणी फी व वर्गणीची फी मंडळ खाती जमा करताच नोंदणी क्रमांक व पुढील नूतनीकरणाचा दिनांक एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे. या नोंदणी क्रमांकाच्या आधारे बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने घेता येईल. या बांधकाम कामगारांना यथावकाश ओळखपत्र वितरित करण्यात येईल.
------------------------
कोट
खबरदारीचा उपाय म्हणून व कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून बांधकाम कामगारांना घरपोच स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. मंडळामार्फत ९ जून २०२१ पासून नेांदणी फी व वर्गणीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने पेमेंट गेटवेमार्फत भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बांधकाम कामगारांना नोंदणी अर्ज मंजूर झाल्यानंतर मंडळामार्फत पाठविण्यात येणाऱ्या एसएमएसद्वारे पेमेंट गेटवेची लिंक पाठविण्यात येत आहे. या लिंकचा वापर करून बांधकाम कामगारांना नोंदणी फी व वर्गणीची रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
- गौरव नालिंदे
सरकारी कामगार अधिकारी, वाशिम