दवाखाने सुरु ठेवा, अन्यथा कठोर भूमिका घेवू - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 05:19 PM2020-03-27T17:19:38+5:302020-03-27T17:20:10+5:30
खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने नियमितपणे सुरु ठेवावे अन्यथा जिल्हा प्रशासनाला नाईलाजास्तव कठोर भूमिका घ्यावी लागेल.
वाशिम : जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने नियमितपणे सुरु ठेवावे अन्यथा जिल्हा प्रशासनाला नाईलाजास्तव कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयएमए व निमा संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत झालेल्या बैठकीत दिला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, आयएमएचे (इंडीयन मेडीकल असोसिएशन) अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे, सचिव डॉ. अमित गंडागुळे, निमाचे सचिव डॉ. राजेश चौधरी यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय व गैरसमज होत आहे. किरकोळ आजार, दुखण्यावर सुध्दा त्यांना उपचार घेण्यासाठी प्रवास करून शासकीय रुग्णालयात यावे लागत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेवरील ताण वाढला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण शासकीय आरोग्य यंत्रणा काम करीत असताना जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने पूर्ववत सुरु ठेवावेत. दवाखाने सुरु ठेवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर जिल्हा प्रशासन त्यामध्ये समन्वय साधून मार्ग काढेल, असे जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले. खासगी दवाखान्यात तसेच औषधी दुकानात काम करणारा कर्मचारी वर्ग, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील आरोग्य मित्र यांनी सुध्दा नियमितपणे कामावर हजर राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या.
आदेशाचे पालन न करणाºयांविरूद्ध होणार कारवाई !
कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्याने राज्यात साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाºयांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या आजारावर उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले दवाखाने सुरु ठेवावेत. तसेच औषधी विक्री केंद्र, प्रयोगशाळा (लॅब) सुध्दा सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोडक यांनी दिला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपेपर्यंत हा आदेश लागू राहणार असून खासगी दवाखाने, औषधी विक्री केंद्र, प्रयोगशाळा (लॅब) यामधील सर्व मदतनीस, नर्स, रिसेप्शनिस्ट यांच्यासह इतर कर्मचाºयांना सुद्धा हे आदेश लागू राहणार आहेत. या आदेशाचे पालन न करणाºया व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ चे कलम २ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.